नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या रविवारी शाईफेक झाल्यानंतर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिय यांनी भाजपला लक्ष्य करत भाजप दिल्ली पोलिसांच्या मदतीने केजरीवाल यांच्या जीवावर उठल्याचे म्हटले आहे.
सम-विषम योजनेच्या यशस्वीतेबद्दल दिल्लीच्या नागरिकांचे आभार मानण्यासाठी आम आदमी पक्षाने (आप) आज आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान एका महिलेने मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या दिशेने शाई फेकली. यानंतर या महिलेला अटक करण्यात आली आहे. केंद्रातील भाजप सरकार आणि दिल्ली पोलिसांचे हे षड्यंत्र असल्याचा आरोप ‘आप‘ने केला आहे.
सिसोदिया म्हणाले की, केजरीवाल यांच्या दिशेने शाई फेकली जात असताना दिल्ली पोलिस काय करत होते? त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. मुख्यमंत्र्यांविरुद्ध शाईफेक हा भाजप आणि दिल्ली पोलिसांचा कट आहे. भाजप दिल्ली पोलिसांच्या मदतीने केजरीवाल यांची हत्याही करु शकते. ही खूप गंभीर गोष्ट आहे. दिल्लीचे पूर्ण मंत्रिमंडळ त्याठिकाणी उपस्थित असताना पोलिस नागरिकांची तपासणी न करता कार्यक्रमाच्या ठिकाणी नागरिकांना सोडत होते. तसेच मंचाच्या आजूबाजूला एक पोलिस कर्मचारीही नव्हता.
