खारघर टोलनाक्यातून मुंबईकरांची सुटका झालेली नाही, या संबंधात आगोदर पसरवण्यात आलेल्या खोटया बातम्यांनी या मार्गावरील वाहनचालक संतप्त झालेले आहेत.
वाशी टोलनाक्यानंतर १३.६ किलोमीटर अंतरावर बेकायदेशीररित्या हा टोलनाका खारघर येथे तयार करण्यात आला आणि संजय काकडे यांनी ३५० कोटी रुपयांना घेतलेला हा टोलनाका ८०० कोटी रुपयांना झी टीव्हीवाल्या गोयल यांना विकला.
२०३० सालापर्यंत या टोलनाक्याला सरकारने वसुलीची मुदत दिली असून, शासनाच्याच नियमाला हरताळ फासून वाशीनंतर अवघ्या १३.६ किलोमीटर अंतरावर या टोलनाक्याची निर्मिती केली.
या टोलनाक्यातून स्थानिकांना सूट मिळवण्याकरिता आंदोलन झाल्यानंतर पनवेल परिसरातील नागरिकांना विशिष्ट परवानापत्र देऊन सूट देण्यात आली आहे. मात्र, निवडणूक प्रचार काळात नितीन गडकरी यांनी हा टोलनाका बंद करण्याचे आश्वासन देताना ‘टोल का खेल मैने शुरु किया, मै ही खत्म करूंगा..’ असे जाहीरपणे सांगितले होते.
फडणवीस सरकारने ५२ टोलनाके बंद करण्याची भूमिका जाहीर केली तेव्हा खारघर टोलनाक्यावर चारचाकी वाहनांना सूट देण्याचे जाहीर केले होते, मात्र प्रत्यक्षात ३१ मेच्या रात्रीनंतर खारघर टोलनाक्यावर जिजिया करासारखी टोलनाक्यावर वसुली सुरूच आहे.
काही वाहनधारकांशी रविवारी (सोमवारी पहाटे) टोलनाक्यावरील कर्मचा-यांनी वाद केला आणि वाहने अडवून ठेवली. मात्र शासनाने या टोलनाक्यातून सामान्य मुंबईकरांना मुक्ती दिलेली नाही. वाशी टोलनाक्यावर ३५ रुपये दिल्यानंतर आता खारघर टोलनाक्याला पुन्हा ३० रुपये द्यावे लागत आहेत.
शासनाने या टोलनाक्याचा पुनर्विचार करण्यासाठी नेमलेली समिती ही डोळयांत धूळफेक करण्यासाठी आहे. या समितीकडून येणारी शिफारस हा टोलनाका रद्द करावा, अशी असणार नाही, अशी व्यवस्था पूर्वीच करण्यात आलेली आहे. त्यामुळे वाशीनंतर लगेच सामान्य माणसाला ३० रुपयांचा भरुदड कायमचा राहील, अशी शक्यता निर्माण झालेली आहे.
