पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून चोरीला गेलेले तब्बल 16 कोटी 66 लाख 78 हजार 327 रुपयांच्या ऐवजापैकी सुमारे 12 कोटी 25 लाखांचा ऐवज चोरट्यांकडून हस्तगत करून तो नागरिकांना परत देण्यात आला. सोनसाखळी, वाहनचोरी प्रकरणातील पाच फिर्यादींना 27 लाखांचा ऐवज पोलिस सहआयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांच्या हस्ते देण्यात आला.
वर्षभरात अशा चोरीचे चार हजार 889 गुन्हे नोंदवण्यात आले होते. त्यापैकी एक हजार 476 गुन्हे तपासात उघडकीस आले. सोनसाखळी चोरीच्या 384 गुन्ह्यांत एक कोटी 33 लाख 32 हजार 750 रुपयांचा ऐवज हस्तगत झाला आहे. त्यातील फिर्यादींना 15 किलो 465 ग्रॅम सोन्याचे दागिने परत देण्यात आले. त्याची किंमत तीन कोटी 80 लाख 56 हजार 589 रुपये आहे, तर वाहनचोरीतील 729 फिर्यादींना सुमारे सात कोटी 86 लाख 36 हजार 589 रुपये किमतींची वाहने परत करण्यात आली. इतर मालमत्तेविषयीच्या गुन्ह्यातील 168 फिर्यादींना एक कोटी 10 लाख 602 रुपयांचा ऐवज परत करण्यात आला. चोरीला गेलेली 19 वाहनेही चोरट्यांच्या ताब्यातून नागरिकांना देण्यात आली.