अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम या वर्षाअखेर म्हणजे डिसेंबरपासून सुरु होणार असल्याचा दावा भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केला आहे.
राम मंदिर उभारणीवरून गेल्या अनेक वर्षांपासून राजकारण सुरु आहे. मात्र, आता स्वामी यांनी राम मंदिर उभारण्यास सुरवात होणार असल्याची घोषणा करून खळबळ उडवून दिली आहे. दिल्लीत 9 जानेवारीला होणाऱ्या एका कार्यक्रमात याबाबतची घोषणा करण्यात येईल, असेही स्वामी यांनी म्हटले आहे.
स्वामी म्हणाले, की अयोध्येत राम मंदिर न्यायालयाच्या निर्णयानंतर आणि हिंदू-मुस्लिम नागरिकांमधील सहमतीनंतर उभारण्यास सुरवात होईल. यासाठी कोणतेही आंदोलन केले जाणार नाही. आम्हाला पूर्ण विश्वास आहे, की राम मंदिराबाबत न्यायालयाचा ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये अंतिम निर्णय येईल. त्यानंतर दोन-तीन महिन्यांत म्हणजे डिसेंबरपासून राम मंदिराच्या बांधकामास सुरवात होईल.
राम मंदिराचा मुद्दा पुढील वर्षी 2017मध्ये उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पुढे आणल्याबाबत बोलताना स्वामी म्हणाले, की राम मंदिराचा मुद्दा निवडणुकीशी जोडला नाही गेला पाहिजे. भगवान राम हा हिंदू नागरिकांसाठी श्रद्धेचा विषय असून, अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी प्रत्येक हिंदू नागरिक कटिबद्ध आहे. राम मंदिराचा मुद्द्यावर हिंदू आणि मुस्लिम नागरिकांमध्ये मैत्रीपूर्ण वातावरणात तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरु आहे.