येत्या मार्चपर्यंत व्होडाफोन दिल्ली आणि मुंबइसह अनेक शहरांमध्ये फोर जी सेवा सुरू करणार आहे. केरळमध्ये उच्च वेगाची फोर जी सेवा व्होडाफोनने अगोदरच सुरू केली आहे. मुंबई, कोलकता, बंगळुरू आणि दिल्ली येथेही मार्च २०१६ पर्यंत ही सेवा सुरू केली जाईल, असे कंपनीने एका पत्रकात म्हटले आहे.
देशातील दुस-या क्रमांकाची टेलिकॉम पुरवठादार असलेल्या कंपनीने मुंबईत फोर जी सिमकार्डचे वाटपही सुरू केले आहे. उच्च वेगाची फोर जी सेवा सुरू होताच आमच्या ग्राहकांना मोबाईल इंटरनेट सेवेचा लाभ घेता यावा, यासाठी ते सज्ज व्हावेत, अशी आमची इच्छा आहे. त्यामुळे फोर जी सिम कार्डची सुविधा देत आहोत, असेही व्होडाफोन इंडियाचे व्यावसायिक प्रमुख इशमीत सिंग यांनी सांगितले.
मुंबईत लवकरच १८०० मेगाहर्टझ बँडमध्ये फोर जी सेवा सुरू करण्यासाठी कंपनी पूर्णपणे तयार आहे, असे सिंग म्हणाले.