नववर्षाच्या स्वागताला काहीवेळ उरला असताना गुरुवारी रात्री दुबईमध्ये दी अॅड्रेस डॉऊनटाऊन’ या ६३ मजली हॉटेलला लागलेल्या भीषण आगीमध्ये १६ जण जखमी झाले आहेत. दुबईतील बुर्ज खलिफा या जगातील सर्वात उंच इमारतीजवळच हे हॉटेल आहे. बुर्ज खलिफाच्या परिसरात नववर्षाच्या स्वागतानिमित्त कार्यक्रम सुरु असताना अचानक ‘दी अॅड्रेस डॉऊनटाऊन’ हॉटेलमध्ये आग भडकली.
यावेळी या परिसरात मोठया प्रमाणावर गर्दी होती. आग भडकल्यानंतर शेकडो कर्मचारी, पोलीस, अधिकारी घटनास्थळी धावले व मदतकार्य सुरू केले. या आगीचे नेमके कारणही अद्याप स्पष्ट झाले नाही. रात्री बाराच्या ठोक्याला मोठी आतषबाजी करण्यात येणार होती. त्यापूर्वीच हॉटेलला आगीने घेरले.
‘दी अॅड्रेस डॉऊनटाऊन’ या गगनचुंबी फाईव्ह स्टार हॉटेलला आग लागल्यानंतर एक हजार फूट उंचीच्या या हॉटेलमधील २० मजले आगीने घेरले होते. स्थानिक टीव्ही चॅनलने दाखविलेल्या दृश्यातून आगीचे मोठे लोळ दिसत होते.
बुर्ज खलिफाच्या परिसरात नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला हजारो लोक जमले होते. या भागात चार लाख एलईडी लाईट लावण्यात आले होते, तर या ठिकाणी १.६ टन वजनाच्या फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार होती. याच दरम्यान ही दुर्घटना घडल्याने एकच धावपळ उडाली.