रशियाच्या दोन दिवसांच्या दौ-यावरून मायदेशी परतत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी अचानक पाकिस्तानला भेट दिली.
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या वाढदिवसा दिवशी शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने मोदी पाकिस्तानला गेले. अकरा वर्षानंतर पहिल्यांदाच भारताचे पंतप्रधान हे पाकिस्तान भेटीवर गेले आहेत. दोन तासांच्या भेटीनंतर रात्रौ ८.३० वाजण्याच्या सुमारास मोदी दिल्लीत पोहोचले.
रशियाचा दौरा आटोपून मोदी हे सकाळीच अफगाणिस्तानला पोहोचले. त्यानंतर अचानक पाकिस्तान दौरा ठरला. लाहोरच्या अल्लमा इक्बाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्थानिक वेळेनुसार दुपारी ४.२० वाजता मोदी उतरले.
पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर हेलिकॉप्टरने ते लाहोर शहराबाहेरील शरीफ यांच्या रायविंड पलाटियल येथील निवासस्थानी गेले. तेथे त्यांनी शरीफ यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी जवळपास दीड तास चर्चा केली. मात्र, त्याचा तपशील कळू शकलेला नाही. गेल्या काही महिन्यांपासून भारत-पाकिस्तानची वाटचाल सकारात्मक दिशेने सुरू आहे. पॅरिसमध्ये मोदी-शरीफ यांनी सर्वकष चर्चा करण्याचे ठरवले होते.
कॉँग्रेसची टीका
मोदी यांनी पाकिस्तानचा दौरा केल्याबद्दल कॉँग्रेसने टीका केली आहे. पंतप्रधान मोदींच्या या साहसवादी भेटीचे परिणाम अत्यंत गंभीर होतील, अशी सणसणीत प्रतिक्रिया कॉँग्रेसने दिली आहे. जनता दल (संयुक्त), ‘आप’ आदी पक्षांनीही मोदींच्या पाकिस्तान दौ-यावर टीका केली.