बॉम्बच्या अफवेवरून मुलाची रवानगी बालसुधारगृहात

बॅगमध्ये बॉम्ब ठेवला आहे, अशी वर्गमित्राबरोबर मस्करी करणा-या अरमान सिंग सराई (१२) या शीख मुलाला तब्बल तीन दिवस बालसुधारगृहात ठेवण्यात आले.

टेक्सासच्या निकोलस ज्युनिअर हायस्कूलमध्ये अरमान शिकतो. वर्गात मस्ती करताना अरमानने गमतीने मित्राला बॅगमध्ये बॉम्ब असल्याचे सांगितले. अरमानच्या मित्राने ताबडतोब शिक्षकांकडे जाऊन अरमानच्या बॅगेत बॉम्ब असल्याचे सांगितले. याबाबत शिक्षकांनी मुख्याध्यापकांना सांगितले असता, त्यांनी त्वरित पोलिसांना बोलावले. पोलिसांनी पूर्ण वर्ग रिकामा करून अरमानच्या बॅगची झडती घेतली. या वेळी त्याच्या बॅगमध्ये बॉम्ब नसल्याचे समोर आले.

पोलिसांनी अरमानची चौकशी केली असता त्याने आपण मस्करी करत होते. माझ्या बॅगेत बॉम्ब नसल्याचे कबूल केले. अशा प्रकारची मस्करी केल्याने पोलिसांनी अरमानची तीन दिवसांसाठी बालसुधारगृहात रवानगी केली. सोमवारी त्याची सुटका झाली.

दरम्यान, अरमानच्या गिनी हेअर या चुलत बहिणीने याबाबत फेसबुकवरून नाराजी व्यक्त केली. एका लहान मुलाला अशी वागणूक देणे अमानुष असल्याचे गिनीचे म्हणणे असून या प्रकरणी जाब विचारण्याचा विचार असल्याचे अरमानचा मोठा भाऊ अक्ष सिंग यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *