दिल्लीच्या राजकारणात नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. कारण अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्रीपद सोडण्याच्या तयारीत आहेत. पंजाब निवडणुकीत विजय मिळावा यासाठी रणनीती आखण्यासाठी या हालचाली सुरु आहेत.
केजरीवालांचा उत्तराधिकारी म्हणून मनिष सिसोदिया मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊ शकतात.
या आश्चर्यकारक हालचालींमुळे दिल्लीपासून – पंजाबपर्यंतच्या राजकारणात वादळ उठण्याची शक्यता आहे.
इंग्रजी वृत्तपत्र ‘टेलिग्राफ’च्या मते, “दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पंजाब निवडणुकीत बाजी मारण्यासाठी मोठी पावलं उचलण्याच्या तयारीत आहेत. केजरीवाल पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. जर असं झालं तर केजरीवाल आपले विश्वासू सहकारी मनिष सिसोदिया यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवू शकतात”.
पंजाबमध्ये 2017 मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. सध्या पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दलाच्या नेतृत्त्वात एनडीएचं सरकार आहे.
दिल्लीसारखा विजय पंजाबमध्येही शक्य आहे, असं केजरीवाल यापूर्वीच म्हणाले होते. लोकसभा निवडणुकीतही ‘आप’ला पंजाबमध्ये तब्बल 4 जागांवर विजय मिळवता आला होता.
त्यामुळे आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये अभियान सुरू केलं आहे. केजरीवाल 14 जानेवारीला पंजाबमध्ये एका रॅलीला संबोधित करणार आहेत. त्यावेळी याबाबतचे काही संकेत मिळू शकतात.
नुकत्याच झालेल्या बिहार निवडणुकीत भाजपला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींची जादू कमी होत असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला आहे. म्हणूनच आम आदमी पार्टी पंजाबमध्ये भाग्य आजमावू पाहात आहे.
केजरीवाल यांच्याकडे दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाऐवजी एकही खातं नाही. अर्थ, शिक्षण, नगर विकास यासारखी सर्व महत्त्वाची खाती उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्याकडेच आहेत.