कॅलिफोर्नियात सॅन बर्नार्डिनो येथील गोळीबाराच्या घटनेनंतर अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी दहशतवाद्यांविरोधात कडक कारवाई करणार असल्याचे सांगत, इस्लामिक स्टेट (इसिस) संबंधी सर्व दहशतवादी संघटनांना नष्ट करू असे म्हटले आहे.
सॅन बर्नाडिनो येथे सईद रिझवान फारूख (वय 28) आणि त्याची पत्नी तशफीन मलिक (वय 27) यांनी गोळीबार केला होता. त्यानंतर पोलिसांशी झालेल्या चकमकीत हे दोघेही ठार झाले होते. या घटनेत 14 जणांचा बळी गेला होता, तर 21 जण जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर पोलिसांना संबंधित दांपत्याच्या घरात मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटकांचा साठा आढळून आला. पाईप बॉंबसह मोठ्या प्रमाणात बंदुकीच्या गोळ्याही या वेळी जप्त करण्यात आल्या होत्या. सईदचे मोबाईल फोन, कॉम्प्युटरची हार्ड डिस्क आदींचा अभ्यास केल्यानंतर हे दांपत्य मूलतत्त्ववाद्यांच्या संपर्कात असल्याची बाब समोर आली होती. सईद हा पाकिस्तानी वंशाचा अमेरिकी नागरिक असून, त्याची पत्नी पाकिस्तानी नागरिक होती. त्यामुळे हे दहशतवादी कृत्य असल्याचे समोर आले होते.
या घटनेनंतर देशाला संबोधित करताना ओबामा म्हणाले, की अमेरिकेला नुकसान पोचविणाऱ्या प्रत्येक दहशतवादी संघटनेला आम्ही नष्ट करू. दहशतवादाचे सावट मोठे असले तरी आम्ही त्याच्याविरोधात लढू. अमेरिकेची ही लढाई म्हणजे मुस्लिम आणि अमेरिका अशी नाही. मुस्लिम समुदायाचे नागरिक आमचे सहकारी आहेत. मुस्लिम समाजातील नागरिकाशी भेदभाव करण्याचे टाळले पाहिजे. अमेरिकेतील प्रत्येक नागरिकाची ही जबाबदारी आहे. इसिसमधील सर्वजण फक्त इस्लामबद्दल बोलतात, ते सर्वजण हत्यारे आहेत. आमचा देश 9/11 नंतर युद्धाच्या दारात असून, दहशतवादासारख्या कर्करोगाशी आम्ही लढत आहोत. ज्यावर कोणताही उपाय नाही. पण, आम्ही मागे न हटता लढू आणि जिंकूही. इसिसला नष्ट करण्यासाठी आम्ही 65 देशांबरोबर मिळून काम करत आहोत. यात आम्हाला यश मिळेल.