प्रवाशांनी खच्चून भरलेल्या लोकलमधून प्रवास करताना डोंबिवलीजवळ भावेश नकाते या २१ वर्षीय तरुणाचा शुक्रवारी मृत्यू झाल्याचे प्रकरण गाजत असतानाच मंगळवारी सकाळी लोकल मधून पडून पुन्हा एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. नरेश महादू पाटील (३२) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
नरेश हा मंगळवारी खोपोली ते ठाणे असा प्रवास करीत होता. मात्र लोकलमध्ये प्रचंड गर्दी असल्याने तो लोकलच्या दरवाज्यात लटकत उभा राहिला होता. दरम्यान ठाणे ते कळव्याच्या दरम्यान त्याचा हात सुटला आणि लोकलट्रेन मधून नरेश खाली पडला.
यावेळी अन्य प्रवाशांनी नरेशला जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे येथे उपचारासाठी दाखल केले असता, कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले.
या प्रकरणात रेल्वे पोलिसांनी अपघाताची नोंद केली आहे.