‘विरोधी पक्षास चहा ऐवजी संत्रा ज्यूस द्या’

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन येत्या 7 डिसेंबरपासून सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सर्व विरोधी पक्षाच्या आमदारांना चहापानाला बोलविण्याची प्रथा आहे. मात्र, यंदा या कार्यक्रमात चहाऐवजी विरोधकांना संत्रा ज्यूस दिला जावा, अशी मागणी विदर्भातील संत्रा उत्पादकांकडून केली जात आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांकडून विरोधकांना चहापानाला बोलावण्याची परंपरा आहे. अधिवेशन काळात चर्चा करण्यात येणाऱ्या मुद्द्यांवर विरोधकांचे अपेक्षित सहकार्य या विषयी यानिमित्ताने चर्चा होते. मात्र, दरवर्षी चहापानावर विरोधक बहिष्कार टाकतात. यावर्षी तीच परंपरा कायम राहण्याची शक्‍यता आहे. संत्राउत्पादक शेतकऱ्यांनी चहापानाऐवजी संत्रा ज्यूस घेण्याकरिता विरोधकांना पाचारण करावे, अशी मागणी केली. विदर्भातील विविध व्हॉट्‌सऍप ग्रुपवर याविषयी जागृती अभियान शेतकऱ्यांद्वारे राबविले जात आहे. त्याची सुरुवात ओंकार दिग्रसकर या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांने केली. दरम्यान, शेतकऱ्यांकडून होणारा हा आग्रह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचावा, याकरिता यवतमाळ जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ई-मेल केल्याची माहिती आहे. या माध्यमातून संत्रा उत्पादकांच्या समस्येकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *