सचिन-सुप्रियाचीच झाली ‘ बनवाबनवी’

सचिन-सुप्रियाचीच झाली ‘ बनवाबनवी’

‘अशी ही बनवाबनवी, या मराठी चित्रपटात प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर यांनी महिलेचा वेश घेऊन ‘बनवाबनवी’ केली होती. आता प्रत्यक्ष जीवनात त्यांना व त्यांची अभिनेत्री पत्नी सुप्रिया यांना खऱ्याखुऱ्या बनवाबनवीला सामोरे जाण्याची वेळ आली असून, पुण्यातील एका ठकसेन तरुणीने त्यांना तब्बल ३५ लाखांना गंडा घातला आहे. बीएमडब्ल्यू कार स्वस्तात मिळवून देण्याच्या आमिषाने त्यांच्याकडून पैसे उकळून ती तरुणी गेल्या तीन महिन्यांपासून पसार झाली आहे. पिळगावकर दाम्पत्याने तिचा शोध घेण्यासाठी अखेर पोलीस ठाणे गाठले. अनघा बोरीकर (२८) असे या तरुणीचे नाव असल्याची फिर्याद त्यांनी वर्सोवा पोलीस ठाण्यात दिली आहे. सचिन पिळगावर हे काही महिन्यांपूर्वी पाचगणी येथे एका कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून गेले होते. त्या वेळी त्यांची चाहती असल्याचे सांगत अनघा बोरीकरने त्यांच्याशी परिचय करून घेतला होता. एका स्थानिक क्रिकेट संघाची मालकीण असल्याची बतावणी केलेल्या अनघाने सचिन यांना नंतरच्या भेटीत ‘बीएमडब्लू ३ जीटी’ ही ५४ लाख रुपये किमतीची अद्ययावत कार स्वस्तात मिळवून देण्याचे आमिष दाखविले. सचिन आणि त्यांची पत्नी सुप्रिया यांच्याकडूनही कारसाठी ३५ लाख उकळले. २० जून रोजी अनघाने एक बीएमडब्ल्यू कार रंग पसंत करण्यासाठीही सचिन यांच्याकडे पाठविली होती. मात्र आरटीओकडून काही कागदपत्रांची पूर्तता होणे बाकी असल्याचे सांगत तिने गाडी परत घेतली. यानंतर तीन दिवसांनी ती फरार झाली. मोबाइल उचलणेही बंद केले. तीन महिने उलटूनही तिचा थांगपता न लागल्याने सचिन व सुप्रिया यांनी याबाबत वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *