मुंबईत १० वर्षांमधील सर्वाधिक तापमान, पुण्यातही पावसाचं आगमन लांबणीवरच; अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Share This:

महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्यानंतर दोन दिवस गोवा आणि तळकोकण येथे पाऊस पडल्यानंतर कोकण किनारपट्टीवरून पाऊस गायब झाला आहे. सध्या वारेही वायव्येकडून असून, यामुळे तापमानाचा ताप अधिकच जाणवत आहे. मुंबईमध्ये गुरुवारी कुलाबा येथे ३६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. गेल्या १० वर्षांमधील हे जूनमधील सर्वाधिक कमाल तापमान आहे.

दोन दिवस उष्ण वातावरण

सन २०२३ ला जून महिन्यात ३६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती. यासोबतच जूनमधील किमान तापमानानेही यंदा विक्रम केला असून सातत्याने पाच दिवस कुलाबा येथे ३० अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले जात आहे. गुरुवारी कुलाबा येथे सरासरीपेक्षा ३.५ अंशांनी कमाल तापमान अधिक नोंदले गेले. सांताक्रूझ येथे कुलाब्यापेक्षा कमी कमाल तापमान होते. सांताक्रूझ येथे ३५.३ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. हे तापमान सरासरीपेक्षा २.३ अंशांनी अधिक होते. वायव्येकडून येणारे वारे, आकाशात पावसाळी ढग नसणे यामुळे कोकण विभागात चढे तापमान होते. गुरुवारी अलिबाग येथे ३६.६ तर हर्णे येथे ३५ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. या केंद्रांवरील तापमान सरासरीपेक्षा ४.३ अंशांनी अधिक होते. कमाल तापमानासोबत किमान तापमानाचाही पारा चढा आहे. मुंबईत कुलाबा येथे गेल्या पाच दिवसांपासून ३० अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद होत आहे. सातत्याने पाच दिवस किमान तापमानाचा पाराही चढा असल्याने मुंबईकरांची रात्रीची झोपही हरवली आहे. २४ तासांमध्ये तापमानाचा पारा ३० अंशाखाली जात नसल्याने वातावरणात उष्णता साचून राहिल्याची सातत्याने जाणीव होत आहे. प्रादेशिक हवामान विभागाने शुक्रवार १२ आणि शनिवार १३ जूनसाठी उष्ण आणि दमट वातावरणाचा महामुंबईला इशारा दिला आहे.

पुण्यात पुढील दोन दिवस आकाश मुख्यतः निरभ्र राहणार असून दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहील. जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे. पोषक वातावरणामुळे मान्सून प्रवास मंदावला आहे. पुढील तीन ते चार दिवस पुण्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता कमी आहे, अशी माहिती ‘आयएमडी’चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी दिली.

पुण्यात आगमन लांबले

पुण्यामध्ये सर्वसाधारणपणे दर वर्षी १० जूनच्या सुमारास दाखल होणाऱ्या नैर्ऋत्य मोसमी पावसाचे आगमन यंदा रखडले आहे. प्रतिकूल घडामोडींमुळे महाराष्ट्रात मान्सूनची पुढील वाटचाल थंडावली आहे. पुढील तीन ते चार दिवसांत पुण्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता नसल्याचे स्पष्टीकरण भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिले आहे.