सततचा खोकला, ताप, भूक न लागणे आणि वजन न वाढणे या त्रासांवर सात वर्षे उपचार घेतल्यानंतर एका दहा वर्षांच्या मुलीच्या आजाराचे अखेर योग्य निदान झाले. लहानपणी तिच्या श्वासनलिकेत पेनाचे टोपण अडकले होते. त्यामुळे तिच्या डाव्या फुप्फुसाच्या खालच्या भागाला गंभीर इजा झाली होती. मुंबईतील खासगी रुग्णालयात ब्रॉन्कोस्कोपी आणि शस्त्रक्रिया करून तिच्यावर उपचार करण्यात आल्यानंतर सध्या तिची प्रकृती स्थिर आहे.
ही मुलगी साडेतीन वर्षांची असल्यापासून तिला सतत खोकला, ताप, भूक न लागणे आणि वजन न वाढणे असा त्रास सुरू होता. टीबीचा संशय आल्याने तिच्यावर त्यानुसार उपचार करण्यात आले. मात्र प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यानंतर तिला दम्याचे निदान करून इनहेलर देण्यात आले; परंतु त्रास कायम राहिला. अखेर तिला मुंबईतील लहान मुलांच्या खासगी रुग्णालयात आणण्यात आले.
बालरोग फुप्फुसरोगतज्ज्ञ डॉ. इंदू खोसला यांनी तिची तपासणी करून योग्य निदान केले. मुलाला बराच काळ सतत खोकला असेल, फुप्फुसांचे वारंवार संसर्ग होत असतील किंवा फुफ्फुसाच्या एकाच भागात पुन्हा पुन्हा समस्या निर्माण होत असेल, तर श्वासनलिकेत बाह्य वस्तू अडकली असण्याची शक्यता तपासणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
ब्रॉन्कोस्कोपीत झाले निदान
सीटी स्कॅनमध्ये मुलीच्या डाव्या फुप्फुसाच्या खालच्या भागाला इजा झाल्याचे दिसून आले. त्यानंतर केलेल्या ब्रॉन्कोस्कोपीमध्ये तिच्या श्वासनलिकेत अनेक वर्षांपासून पेनाचे झाकण अडकले असल्याचे स्पष्ट झाले. ते झाकण बाहेर काढण्यात आले; मात्र फुप्फुसाच्या खालच्या भागाला कायमस्वरूपी इजा झाली होती. संसर्गाचा धोका लक्षात घेऊन खराब झालेला भाग काढण्यासाठी थोरॅकोस्कोपिक लेफ्ट लोअर लोबेक्टॉमी शस्त्रक्रिया करण्यात आली. या उपचारांमुळे मुलीच्या जिवावरील धोका टळला.
