कल्याण डोंबिवलीत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, पालघर आणि ठाण्याला रेड अलर्ट, नाशिकमध्ये हाहा:कार

Share This:

महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने कमबॅक केलं आहे. विशेष म्हणजे पालघर जिल्ह्यात पावसाने अक्षरश: थैमान घातलेलं बघायला मिळत आहे. यासोबतच ठाणे जिल्ह्यातही सर्वदूर मुसळधार पाऊस पडत आहे. ठाण्यातील कल्याण डोंबिवलीत मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस पडत आहे. तसेच नाशिकमध्ये देखील पावसाचा हाहा:कार बघायला मिळतोय. मुसळधार पावसाने नाशिकमध्ये रामकुंड परिसरात अनेक मंदिरं ही पाण्याखाली गेली आहेत. राज्यातील अनेक भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

पालघर जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस

महाराष्ट्रातील पालघर जिल्हा आणि गुजरातच्या वलसाड, उंबरगाव परिसरात पावसाचे ढग मोठ्या प्रमाणात बघायला मिळाले आहेत. त्यामुळे तिथे पाऊस देखील तसाच पडत आहे. गुजरातच्या उंबरगाव येथे तर केवळ 24 तासात तब्बल 906 मिमी विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच वलसाडमध्येदेखील मुसळधार पाऊस सुरु आहे. गुजरातच्या सीमेला लागून असलेल्या पालघर जिल्ह्यात देखील पावसाचं रौद्ररुप बघायला मिळत आहे.

पालघर जिल्ह्यात गेल्या 24 तासांच मुसळधार पाऊस पडला आहे. त्यामुळे अनेक नद्यांना पूर आल्यासारखी स्थिती आहे. मुसळधार पाऊस आणखी पुढचे 24 तास राहणार असल्याची शक्यता आहे. कारण हवामान विभागाकडून पालघर जिल्ह्याला पुढच्या 24 तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. या काळात वाऱ्याचा वेग तब्बल 70 किमी प्रतितास असण्याची शक्यता आहे. यामुळे प्रशासन अलर्टवर आहे. प्रशासनाचे कर्मचारी संभाव्य धोका लक्षात घेऊन अलर्टवर आहेत. तसेच नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

ठाणे जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट, कल्याण-डोंबिवलीत मुसळधार पाऊस

ठाणे जिल्ह्यालादेखील पुढच्या 24 तासांसाठी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली शहरात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. कल्याण डोंबिवलीत बुधवारी रात्रीपासून पावसाची संततधार सुरुच आहे. सकाळीदेखील संततधार सुरु होती. पावसासह वारा देखील मोठ्या प्रमाणात आहे.