अधिक मासाचे औचित्य साधून गोव्यातील एका भक्ताने अभूतपूर्व देणगी दिली आहे. करवीर निवासिनी श्री.अंबाबाई मंदिराच्या तब्बल साडेतेरा फूटांचा आणि दीड किलो सोन्याचा कळस दिला आहे.
अत्यंत मौल्यवान सोन्याचा कळस
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आणि देशभरातील लाखो भक्तांचे आराध्यदैवत असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या मुख्य शिखरावर काल गुरुवारी रात्री विधिवत पद्धतीने अत्यंत मौल्यवान सोन्याचा कळस बसविण्यात आला आहे.
कळसाचे वजन तब्बल 1.5 किलो
मंदिर प्रशासनाच्या अधिकृत माहितीनुसार, कळसाचे वजन तब्बल 1.5 किलो सोनं असून, साधारण साडेतेरा फूट उंचीचा असलेल्या कळसाची सध्याच्या बाजारभावानुसार किंमत अडीच कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचा अंदाज आहे.
अधिक मासानिमित्त गोव्यातील भक्ताची देणगी
हिंदू धर्मशास्त्रात अधिक मासाला अत्यंत पवित्र मानले जाते. याच पवित्र महिन्याचे औचित्य साधून हा कळस बसवण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला. हा कळस गोव्यातील एका दानशूर भाविकाने अत्यंत गुप्तता पाळत देवीच्या चरणी अर्पण केले आहे. त्या भाविकाने थेट मंदिराच्या शिखरासाठी 1.5 किलो सोन्याचा कळस तयार करून दिला असून, त्याचे नाव अद्याप समोर आलेले नाही.
वास्तुकला आणि तांब्याचे संरक्षक आवरण
मंदिराचे मूळ शिखर 6 फूट उंच असून, त्यावर गोलाकार डेरा आकर्षक आहे. पावसाचे पाणी झिरपू नये आणि कळस तसेच मूळ शिखर संरक्षित राहील, यासाठी कळसाभोवती 200 किलो तांब्याचे संरक्षक आवरण बसविण्यात आले आहे. हे आवरण मंगलोर येथील कुशल कारागिरांनी तयार केले असून, त्यावर 1.5 किलो सोन्याचा मुलामा दिला आहे.
क्रेन, ४० कर्मचारी आणि रात्रभर काम
कळसारोहणाचे काम गुरुवारी रात्री 8 वाजता सुरू करण्यात आले. कळस प्रथम मंदिराच्या छतावर नेण्यात आला, व क्रेनच्या सहाय्याने तो शिखरापर्यंत उचलून बसविण्यात आला. कळस नाजूक असल्याने प्रत्येक टप्प्यावर धक्क्यापासून वाचवण्यासाठी विशेष काळजी घेण्यात आली.
सुमारे 40 कर्मचारी कार्यरत
जेव्हा हा कळस बसवण्यात येत होता, तेव्हा यासाठी सुमारे 40 कर्मचारी कार्यरत होते आणि देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी यांनी रात्रभर घटनास्थळी उपस्थित राहून संपूर्ण कामकाजावर देखरेख ठेवली.
शुक्रवारी शास्त्रोक्त पूजन आणि धार्मिक विधी
कळस बसवून पूर्ण झाल्याने शुक्रवारी सकाळी वैदिक मंत्रोच्चारांसह पारंपरिक पूजन आणि धार्मिक विधी आयोजित करण्यात आले आहेत. देवस्थान समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार, या विधींमध्ये स्थानिक पुरोहित, समिती सदस्य आणि काही मान्यवर उपस्थित राहतील.
