लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट; सरकारकडून ३४५ कोटी रुपये वर्ग, मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार?

Share This:

लाखो लाभार्थी महिला अपात्र ठरल्यामुळे चर्चेत आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या योजनेतील लाभार्थी महिलांना मे महिन्याचा हप्ता देण्यासाठी राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून नुकतेच ३४४ कोटी ५५ लाख रुपये महिला आणि बालविकास खात्याकडे वर्ग करण्यात आले आहेत. त्यामुळे लाभार्थी महिलांना मे महिन्याचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

निकषात न बसणाऱ्या व्यक्तींनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फायदा घेऊ नये, यासाठी सरकारकडून लाभार्थ्यांना ई केवायसी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र ई केवायसी प्रक्रियेदरम्यान जवळपास ८० लाख महिला या योजनेतून अपात्र ठरल्या. यातील ६० लाख महिलांनी ई केवायसी पूर्ण केलेली नव्हती तर २० लाख महिला योजनेच्या निकषात बसत नसल्याने अपात्र ठरल्या.

मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार?

सत्ताधारी भाजपच्या एका महिला आमदाराने याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत मे महिन्याचा हप्ता १२ ते १५ जूनदरम्यान मिळू शकतो, अशी शक्यता वर्तवली होती. मात्र याबाबत अजून सरकारी पातळीवर अद्याप काही हालचाली झाल्या नसल्याचे समजते. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्यातील हप्तासाठी महिलांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.

योजनेत किती महिला पात्र?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या या योजनेत सुरुवातीला तब्बल २ कोटी ३१ लाख इतक्या महिला पात्र ठरल्या होत्या. मात्र निकषात न बसणाऱ्या अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे नंतर स्पष्ट झालं. राज्य सरकारने पात्र लाभार्थी महिलांची ई-केवायसी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ८० लाखांहून अधिक लाभार्थी अपात्र ठरले.