पतीकडून पोटगी मिळावी म्हणून पत्नीने न्यायालयात धाव घेतल्याचे आपण नेहमीच ऐकतो, पाहतो, पण घरकाम करणाऱ्या पतीने मुख्याध्यापिका असलेल्या पत्नीकडून पोटगी मिळावी म्हणून न्यायालयात धाव घेतली आहे.
दीपाली (वय 38) उच्चशिक्षित तर राजेश (वय 42) अशिक्षित आहे (नावे बदलली आहेत). दोघांची एका वधू-वर परिचय मेळाव्यात ओळख झाली. सांगली जिल्ह्यात राहणारा राजेश गरीब कुटुंबातील. त्याने दीपालीला आपल्या परिस्थितीची कल्पना दिली. तिने राजेशसोबत लग्न करण्यास इच्छा व्यक्त करताना काही अटी घातल्या. नोकरी करीत असल्यामुळे तिने राजेशच्या गावी नांदण्यास येऊ शकणार नाही, असे सांगितले. राजेशनेच तिच्याकडे नांदायला यावे,
घरातील सर्व कामे करावीत, अशी अट तिने घातली. गरिबीमुळे राजेशने रितीरीवाजाच्या उलट अटी मान्य केल्या.
24 नोव्हेंबर 2004 रोजी दोघांनी दानम्मादेवी देवस्थान (गुड्डापूर, ता. जत, जि. सांगली) येथे लग्न केले. ठरल्याप्रमाणे राजेश दीपालीकडे नांदण्यास आला. दीपालीने सांगितलेल्या अटींचे राजेश पालन करीत होता. दीपाली रागीट स्वभाव असल्याने छोट्या छोट्या गोष्टींमुळे पतीला टोमणे मारायची. काही महिन्यांपूर्वी राजेशच्या हातून घरात दूध सांडले. त्याने रागावलेल्या पत्नीच्या पाया पडून माफी मागितली. तरीही तिने रागाच्या भरात शिवीगाळ करून पतीला मारहाण केली. रागाच्या भरात दीपालीने राजेशला घरातून हाकलून लावले. माफी मागूनही तिने घरात पतीला घरात घेण्यास नकार दिला. अशिक्षित राजेश काहीच काम करू शकत नसल्याने त्याचे हाल सुरू झाले. सध्या तो हालाखीचे जीवन जगत आहे. त्याने गेल्या आठवड्यात हिंदू विवाह कलम नऊ व 24 अन्वये पत्नी दीपालीने नांदण्यास घरात घ्यावे, या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत पत्नीकडून पोटगी मिळावी, असा अर्ज वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश हेमलता भोसले यांच्या न्यायालयात केला आहे. राजेशकडून ऍड. जयदीप माने, ऍड. मनोज गिरी हे काम पाहत आहेत. दीपाली सोलापुरातील एका खासगी शाळेत मुख्याध्यापिका आहे. पतीने पत्नीच्या विरोधात अशा प्रकारचा दावा दाखल करण्याची ही सोलापूरच्या न्यायालयीन इतिहासातील पहिलीच घटना असल्याचे ऍड. माने यांनी सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 16 डिसेंबर 2015 रोजी होणार आहे.
जेवणाचा डबा, झाडलोट अन् पाय चेपले..
लग्नानंतर दीपाली सकाळी झोपेतून उठायची आणि तयार होऊन नोकरीवर निघून जायची. राजेश प्रेमाने पत्नीला जेवणाचा डबा करून द्यायचा. घरातील सर्वच कामे राजेश करीत होता. झाडलोट करण्यापासून अगदी पत्नीचे पाय चेपण्यापर्यंतची सेवा राजेशने केली.
लग्नानंतर दीपाली सकाळी झोपेतून उठायची आणि तयार होऊन नोकरीवर निघून जायची. राजेश प्रेमाने पत्नीला जेवणाचा डबा करून द्यायचा. घरातील सर्वच कामे राजेश करीत होता. झाडलोट करण्यापासून अगदी पत्नीचे पाय चेपण्यापर्यंतची सेवा राजेशने केली.