मोठं झाल्यावर तुला कोण व्हायचयं? हा घासून गुळगुळीत झालेला प्रश्न पुण्याच्या इशिता कत्याल या दहा वर्षांच्या चिमुकलीलाही तिच्या घरी येणारे पाहुणे नेहमी विचारत असत. पण, आपली वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी तिला मोठं होण्याची वाट पाहायची नव्हती. तिला आपली वेगळी छाप पाडायची होती. तिचे हे स्वप्न बालदिनाच्या दिवशी पूर्ण झाले. इशिताने जागतिक पातळीवर आपली छाप पाडली आहे.
न्यूयॉर्कमध्ये आयोजित टेक्नोलॉजी,एन्टरटेन्मेंट आणि डिझाईन(टेडेक्स) आयोजित युवा परिषदेत संबोधित करण्याची संधी इशिताला मिळाली. बदल घडविण्याची क्षमता लहान मुलांमध्ये नाही, असा विचार करणाऱया व्यवस्थेला आव्हान देत ‘आता तुम्हाला मोठं झाल्यावर काय व्हायचयं?’ या मथळ्याखाली इशिताने न्यूयॉर्कच्या ‘टेडेक्स’ परिषदेत भाषण केले. अवघ्या चार मिनिटांच्या आपल्या भाषणात तिने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. विशेष म्हणजे, इशिता ही या परिषदेला संबोधित करणारी सर्वात लहान वक्ता ठरली आहे.
पुण्यात २०१३ साली ‘टेडेक्स’ने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाच्या माध्यमातून इशिताचा ‘टेडेक्स’सोबतचा प्रवास सुरू झाला होता. ‘टेडेक्स’ आयोजित सत्रांना इशिताने आवर्जुन उपस्थिती लावली होती. ‘टेडेक्स’च्या कार्यक्रमांत तिचे मन रमले होते. त्यानंतर तिने पुढाकार घेऊन यात आपल्यालाही सहभागी होता येईल का? अशी आयोजकांना विचारणा केली. आयोजकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला पण, त्यासाठी तिला दोन स्तरावरील मुलाखतीला सामोरे जावे लागणार होते. ‘टेडेक्स’च्या जागतिक संयोजकांच्या नेतृत्त्वाखाली ‘स्काईप’द्वारे झालेले मुलाखतीचे दोन्ही स्तर तिने पूर्ण केले आणि ती ‘टेडेक्स यूथ इव्हेंट्स’च्या आयोजक पथकातील सर्वात लहान वयाची संयोजक झाली, असे इशिताची आई नॅन्सी कत्याल यांनी सांगितले.
संयोजक झाल्यानंतर इशिताने आपल्या शाळेत ७ फेब्रुवारी रोजी यशस्वीरित्या टेडेक्सच्या कार्यक्रमाचे आयोजन केले. यानंतर न्यूयॉर्कमध्ये टेडेक्स आयोजित परिषदेला उपस्थित राहण्याची संधी चालून आली. संस्थेच्या मुख्य कार्यक्रमात तिला भाषण करण्याचे सांगण्यात आले तेव्हा ती सर्वात लहान असल्याने थोडं दडपण आलं होतं कारण, कोणताही कागद हाताशी न ठेवता बोलणं कठीण होतं. पण, तिने आपल्या भाषणातून उपस्थितांचे मन जिंकल्याचे नॅन्सी यांनी सांगितले.