मागच्या २४ तासांत अक्वान चक्रीवादळामुळे हवामानात मोठे बदल झाले आहेत. अचानक कोकण आणि घाटमाथ्यावरही थंडी वाढली आहे. उत्तर महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात ढगाळ वातावरण तयार झालं आहे. महाराष्ट्रात पुढचे ४८ तास कोरडं वातावरण राहील. तर पूर्व विदर्भात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल.
उत्तर महाराष्ट्रासह पुणे परिसरात तापमानात मोठी घट
राज्यात थंडीचा कडाका वाढला असून, उत्तर महाराष्ट्रासह पुणे परिसरात तापमानात मोठी घट नोंदली गेली. धुळे येथे शुक्रवारी राज्यातील नीचांकी ६ अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली. मुंबईत किमान तापमानापाठोपाठ आता कमाल तापमानातही घट जाणवू लागली आहे. निफाडमध्ये ६.५ अंश, जळगावात ८ अंश, तर नाशिकमध्ये हंगामातील नीचांकी १० अंश सेल्सियस तापमान नोंदले गेले. पुण्यातही हुडहुडी वाढली असून, शहरात या हंगामातील नीचांकी ११.३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.
