डोळा लागला अन् ऐवज गेला! विदर्भ एक्स्प्रेसमधून 26 लाखांचे दागिने चोरीला, आरोपीला पश्चिम बंगालमधून बेड्या

 लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासात डोळा लागला तर चोरांसाठी तीच संधी ठरते. विदर्भ एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका तरुणाच्या बाबतीत असाच प्रकार घडला. झोपेचा फायदा घेत चोराने त्याची बॅग लंपास केली. बॅगेतील सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह तब्बल २६ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला. सीएसएमटी रेल्वे पोलिसांच्या तपासामुळे या प्रकरणाचा उलगडा झाला. पोलिसांनी पश्चिम बंगालमधून आरोपीला अटक करून संपूर्ण दागिने ताब्यात घेतले. न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व दागिने संबंधित प्रवाशाला देण्यात आले.

अभिषेक शिकरवार हे १७ जानेवारी २०२६ रोजी गाडी क्रमांक १२१०४ विदर्भ एक्स्प्रेसने नागपूरहून मुंबईला प्रवास करत होते. एक्स्प्रेसच्या आसनावर त्यांचे आरक्षण होते. मध्यरात्री पावणे तीन वाजण्याच्या सुमारास गाडी नाशिक रेल्वे स्थानकात पोहोचली, तेव्हा ते त्यांची सॅकबॅग जवळ ठेवून झोपी गेले. सकाळी सातच्या सुमारास गाडी सीएसएमटी स्थानकातील फलाट क्रमांक १२वर पोहोचल्यानंतर त्यांना जाग आली. त्यावेळी त्यांची सॅकबॅग गायब असल्याचे दिसले. त्यांनी तातडीने सीएसएमटी रेल्वे पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार केली. त्यांच्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला.

सीएसएमटी रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी कटारे आणि गुन्हे शाखेच्या कल्याण युनिटचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांनी समांतर तपास सुरू केला. विदर्भ एक्स्प्रेस थांबे असलेल्या रेल्वे स्थानकातील एस-३ डब्यासमोरील सर्व स्थानकांतील सीसीटीव्ही तपासण्यात आले. यात त्यांना एक संशयित व्यक्ती बॅग घेऊन जात असल्याचे दिसून आले. रेल्वे पोलिसांनी शोध घेतला असता तो पश्चिम बंगालला गेल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली. रेल्वे पोलिसांनी पश्चिम बंगालमधील स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपी जाहीर जमाल शेखला अटक केली.

दागिने ताब्यात घेतल्यावर रेल्वे पोलिसांकडून प्रवासी अभिषेक शिकरवार यांना दागिने परत देण्याची प्रक्रिया सुरू केली. सीएसएमटीतील वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी कटारे यांनी न्यायालयात सातत्याने पत्रव्यवहार आणि पाठपुरावा केला. संपूर्ण घटनाक्रम न्यायालयात मांडला. दागिन्यांची वैधता आणि मालकी तपासल्यावर संबंधित दागिने प्रवासी यांना सोपवण्याचे आदेश न्यायालयाने रेल्वे पोलिसांना दिले. त्यानुसार चोरीला गेलेले दागिने नऊ महिन्यांनंतर प्रवाशाला सोपवण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *