महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रात पोलिसांच्या उपस्थितीत एका सराईत गुन्हेगाराने महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला कानशिलात लगावली. या घटनेमुळे वैद्यकीय समुदायात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. ही घटना आरवी तालुक्यातील तळेगाव श्यामजी पंत प्राथमिक आरोग्य केंद्रात घडली. डॉ. श्रद्धा भूमारे तेथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर करण्यापूर्वी वैद्यकीय तपासणीसाठी आणलं होतं.
गालावर जोरदार चापट लगावली
तपासणी पूर्ण झाल्यावर आरोपीने काही कागदपत्रांवर सही केल्यानंतर, त्याने अचानक डॉक्टरच्या गालावर जोरदार चापट मारली. आरोपी कादिर अली रझ्झाक अली हा स्थानिक रहिवासी असून त्याच्यावर यापूर्वी अनेक गुन्हेगारी खटले दाखल आहेत. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. उपस्थित पोलीस अधिकारी हादरले आणि त्यांनी आरोपीला पकडलं, पण या घटनेनं उपस्थित रुग्ण आणि रुग्णालयातील कर्मचारीही थक्क झाले.
