लग्नानंतरही पत्नी बॉयफ्रेंडला भेटायला गेली, पतीने रंगेहाथ पकडलं, संतापात नवऱ्याने तरुणाला संपवलं; पुरावा मिटवण्यासाठी राक्षसी कृत्य

पत्नीचं लग्नापूर्वीचे प्रेमसंबंध आणि त्यातून निर्माण झालेल्या वादातून एका तरुणाचा निर्घृण खून करून त्याचा मृतदेह थेट कालव्यात फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गणेश मच्छिंद्र गायकवाड (वय ३२, रा. कमलपूर, ता. श्रीरामपूर) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. शिंगवे नाईक येथे त्याला मारहाण करून ठार मारल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने राहुरी कृषी विद्यापीठाजवळील मुळा धरणाच्या बॅकवॉटर कालव्यात मृतदेह फेकून देण्यात आल्याचं तपासात समोर आलं आहे. या प्रकरणी महेश राजेंद्र जाधव आणि योगेश राजेंद्र जाधव या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. एमआयडीसी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेनं समन्वयानं केलेल्या कारवाईमुळे या हत्येचा उलगडा झाला असून, कुक्कडवेढा येथे मृतदेह शोधण्यातही पोलिसांना यश आलं आहे.

पत्नीचे जुन्या प्रियकराशी संबंध; घरातच घडला थरार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश जाधव याची पत्नी शुभांगी हिचे गणेश गायकवाड याच्याशी लग्नापूर्वीपासून प्रेमसंबंध होते. गणेश हा शुभांगीला भेटण्यासाठी शिंगवे नाईक येथे आला होता. याचवेळी महेश जाधव आणि योगेश जाधव यांनी त्याला पकडलं. त्यानंतर त्याला मारहाण करून ठार मारण्यात आलं. या घटनेची कोणालाही माहिती होऊ नये आणि गुन्ह्याचा पुरावा नष्ट व्हावा, या उद्देशाने दोघांनी गणेशचा मृतदेह राहुरी कृषी विद्यापीठाजवळील मुळा धरणाच्या बॅकवॉटर कालव्यात फेकून दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादाचे पर्यावसन थेट हत्येत झाल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे.

एक आरोपी जळगावात, दुसरा मुळा धरणाजवळ

गणेशचा भाऊ प्रदीप मच्छिंद्र गायकवाड (वय ३४, रा. कमलपूर, ता. श्रीरामपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात हत्येचा आणि पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपास सुरू असताना महेश जाधव हा राहाता तालुक्यातील जळगाव येथे लपून बसल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांना मिळाली. त्यानुसार पथकाने तत्काळ कारवाई करून महेशला ताब्यात घेतलं. दरम्यान, दुसरा आरोपी योगेश जाधव हा राहुरी येथील मुळा धरण परिसरात लपून बसल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक हरीश भोये यांना मिळाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यालाही शिताफीनं ताब्यात घेतलं. दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं.

कालव्याच्या काठाने शोधमोहीम; अखेर मृतदेह सापडला

आरोपींकडे चौकशी केल्यानंतर गणेशचा मृतदेह मुळा धरणाच्या बॅकवॉटर कालव्यात फेकून दिल्याची माहिती समोर आली. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी तातडीने पथक तयार करून कालव्याच्या परिसरात शोधमोहीम सुरू केली. कालव्याच्या विविध भागात शोध घेत असताना अखेर राहुरी तालुक्यातील कुक्कडवेढा येथे गणेशचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी नातेवाइकांना बोलावलं. नातेवाइकांनी मृतदेह गणेश गायकवाड याचाच असल्याची खात्री केली. त्यामुळे हत्येच्या या प्रकरणातील महत्त्वाचा दुवा पोलिसांच्या हाती लागला.

दोघेही पोलिसांच्या कोठडीत; वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई

या प्रकरणातील महेश जाधव आणि योगेश जाधव या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना २४ ऑक्टोबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या हत्येमागील नेमकी परिस्थिती, घटनेचा घटनाक्रम आणि अन्य बाबींचा तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात करीत आहेत.

गुन्हे शाखेची मोठी कारवाई

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि नगर ग्रामीण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस उपनिरीक्षक अजय कौटे यांच्यासह एमआयडीसी पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार तसेच सहायक पोलीस निरीक्षक हरीश भोये यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *