येत्या गणेशोत्सवासाठी किंवा दिवाळीसाठी तथा सणासुदीच्या काळात खाद्यपदार्थांची वाढणारी मागणी लक्षात घेऊन अन्न व औषध प्रशासनानं मोठी धडक कारवाई केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे FDA ठाणे विभागाने 9 सप्टेंबर बुधवारी रोजी शिळ-दिवा रोडवरील खर्डी गाव परिसरातील भास्कर कम्पाऊंड येथे अचानक छापा टाकला. फरसाण, वेफर्स, चिवडा, नमकीन आणि अन्य खाद्यपदार्थांचं उत्पादन किंवा विक्री करणाऱ्या तब्बल 11 आस्थापनांची तपासणी करण्यात आली.
वापरलेलं खाद्यतेल साठवून ठेवलं
कारवाईदरम्यान विविध आस्थापनांमध्ये बटाटा वेफर्स, फराळी चिवडा, तिखा वेफर्स, काळी मिरी वेफर्स, मिक्स फरसाण, शेव, भाकरवडी, चिवडा, डाएट चिवडा, शेजवान स्टिक्स आणि केळीचे चिप्स आढळले. याशिवाय उत्पादनासाठी वापरण्यात येणारे मैदा, बेसन, वाटाणा पीठ, पामोलिन तेल आणि वापरलेले काळंकुट्ट खाद्यतेलही साठवून ठेवण्यात आलं होतं. तपासणीदरम्यान 28,955 किलो आणि 56 लिटर इतका साठा जप्त करण्यात आला. या मालाची किंमत तब्बल 20,48,801.50 रुपये असल्याचं FDAने सांगितलं आहे. भेसळ किंवा कमी दर्जाचा असल्याच्या संशयावरून तसेच अत्यंत अस्वच्छ व असुरक्षित ठिकाणी उत्पादन होत असल्यानं हा साठा अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 अंतर्गत जप्त करण्यात आला.
