पावसाळ्यात जिवंत मासे गिळण्यासाठी लोकांची गर्दी होते; भारतातील 180 वर्ष जुनी परंपरा पुन्हा चर्चेत

भारतात अनेक धार्मिक परंपरा पाळल्या जातात. अनेक पंरपरा या शतकांपासूनच नव्हे, तर दशकांपासून सुरु आहेत. यापैकीच एक हैदराबादची जिवंत मासे गिळण्याची परंपरा. पावसाळ्यात जिवंत मासे गिळण्यासाठी लोकांची गर्दी होते होते. माशांचा प्रसाद… म्हणून ही परंपरा पाळली जाते.

हैदराबादची ही 180 वर्षे जुनी परंपरा आहे.  पावसाळ्याच्या सुरुवातीला याचे आयोजन केले जाते. या काळात, देशभरातील विविध राज्यांमधून लोक हैदराबादमध्ये गर्दी करतात आणि माशांचा प्रसाद घेण्यासाठी लांब रांगा लावतात.  या परंपरेनुसार, एका लहान जिवंत माशाच्या तोंडात एक विशेष वनौषधींचा लेप भरला जातो. यानंतर हा जिवंत मासा लोक गिळतात.
दमा आणि श्वसनाच्या इतर समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांना तो गिळायला दिला जातो. हा वनौषधींचा फॉर्म्युला पिढ्यानपिढ्या चालत आलेला आहे. त्याचे सेवन केल्याने श्वसनाच्या आजारांपासून आराम मिळू शकतो असा दावा ही परंपरा जपणारे कुटुंब करत आहे.

लाखो लोक संपर्क साधतात?

दम्याच्या त्रासापासून आराम मिळाल्याचा दावा माशांचा प्रसाद सेवन करणारे करतात.  अनेक जण आपले वैयक्तिक अनुभव सांगतात की, या उपचारानंतर त्यांना बरे वाटते. याच विश्वासामुळे दरवर्षी लाखो लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहतात. अनेक कुटुंबे पिढ्यानपिढ्या ही परंपरा जपत आहेत.

डॉक्टर काय म्हणतात?

वैद्यकीय तज्ज्ञांचे मत वेगळे आहे. डॉक्टरांच्या मते, माशांचा प्रसाद दम्यावर उपचार करू शकतो हे सिद्ध करण्यासाठी कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा नाही. तज्ज्ञांच्या मते, दमा हा एक गुंतागुंतीचा आजार असून त्यावर शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेल्या औषधांनी आणि उपचारांनीच उपचार केला पाहिजे. कोणताही पर्यायी उपाय करून पाहण्यापूर्वी रुग्णांनी वैद्यकीय सल्ला घ्यावा, असं त्यांचे म्हणणे आहे.

श्रद्धा विरुद्ध विज्ञान वादविवाद

माशांचा प्रसाद हा कार्यक्रम दरवर्षी वादाचा विषय ठरतो. श्रद्धा, परंपरा आणि वैयक्तिक अनुभवांशी जोडलेला आहे, तर दुसरीकडे डॉक्टर पुराव्यावर आधारित वैद्यकशास्त्रावर भर देतात. यामुळे हा प्रसंग केवळ आरोग्याचा मुद्दा न राहता, श्रद्धा आणि विज्ञान यांच्यातील वादाचा विषय आहे.
डिजिटल युगातही माशांच्या प्रसादाची लोकप्रियता किंचितही कमी झालेली नाही. या विधीचे व्हिडिओ आणि फोटो दरवर्षी सोशल मीडियावर व्हायरल होतात. जिवंत माशांमुळे दम्यापासून आराम मिळतो हा दावा हा प्रसाद घेणारे करतात. ही परंपरा सतत चर्चेचा विषय असते. अनेक वाद झाले तरी हैदराबादच्या फिश प्रसादम कार्यक्रमाला होणारी गर्दी काही कमी होत नाही. उलट ही गर्दी सातत्याने वाढत राहते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *