भारत- पाकिस्तान तणावादरम्यानच हवाई वाहतुकीवर याचे थेट परिणाम दिसून आले. जिथं देशातील तब्बल 32 विमानतळं काही दिवस नागरी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आली होती. मात्र शस्त्रसंधीनंतर हे चित्र काही अंशी बदलताना दिसलं. पुन्हा एकदा विमानतळांवरील वाहतूक तर सुरू झाली खरी, मात्र अनेक उड्डाणं रद्द झाल्यां प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. त्यातच आता विमानप्रवास करणाऱ्यांना आणखी एक फटका बसला आहे. तो म्हणजे तिकीट दरवाढीचा.
विमानप्रवास महागला…
विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरणाच्या वतीनं मंजुरी मिळाल्यानंतर विमान प्रवासादरम्यानच्या प्रवासी सुविधा निर्माण शुल्काची (युझर डेव्हलपमेंट फी) अंमलबजावणी सुरू होणार असून, त्यामुळं 16 मे पासून विमान प्रवासभाजं महागणार आहे. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठीचे तिकीट दर या अंमलबजावणीनंतर वाढणार आहेत. प्राथमिक माहितीनुसार वाढील शुल्काची ही नियमावली 31 मार्च 2029 पर्यंत लागू असेल. त्यामुळं इथून पुढं विमान तिकीट काढताना खात्यावर पुरेसे पैसे आहेत की नाही हेसुद्धा पाहूनच घ्या.
