कोकण रेल्वेवर 15 जूनपासून लागू होणार पावसाळी वेळापत्रक; ट्रेनचा वेग कमी होणार, काही गाड्या रद्दही होणार

मान्सूननं अंदमानात प्रवेश केला असून, आता टप्प्याटप्प्यानं हेच मोसमी वारे केरळामागोमाग कोकणमार्गे महाराष्ट्रात दाखल होतील. याच मान्सूनच्या धर्तीवर एकिकडे प्रशासनानं अनेक कामं मार्गी लावण्यासाठी वेगानं हाचलाली सुरु केलेल्या असताना रेल्वे प्रशासनसुद्धा इथं मागे राहिलेलं नाही. दरवर्षीप्रमाणं यंदासुद्धा कोकण रेल्वेमार्गावर पावसाळी वेळापत्रकाची लगबग सुरू झाली असून, 15 जूनपासून ते लागू होणार असल्याची माहिती जारी करण्यात आली.

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी वेळापत्रकासंदर्भातील माहिती आणि परिपत्रक जारी करत याबाबतची माहिती दिली. यामध्ये नमूद माहितीनुसार पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कोकण रेल्वे विभागातील सर्व मेल/एक्सप्रेस आणि प्रवासी गाड्यांच्या वेळा 15 जून 2025 ते 20 ऑक्टोबर 2025 पर्यंत तात्पुरत्या स्वरूपात बदलण्यात येतील.

जून महिन्यापासून थेट ऑक्टोबरपर्यंत हे पावसाळी वेळापत्रक लागू राहणार असून, गणेशोत्सवाचे दिवसही याच कालावधीत येत असल्यानं आतापासूनच गणपतीच्या सुट्ट्यांचं नियोजन कसं करायचं याची आखणी करण्यास अनेकांनीच सुरुवात केली आहे. पावसाळी वेळापत्रकामुळे पश्चिम रेल्वेवरून धावणाऱ्या 23 गाड्यांच्या वेळांमध्ये बदल करण्यात येतील.

कोणत्या रेल्वेगाड्या प्रभावित? 

नव्या वेळापत्रकानुसार सीएसेमटी- वंदे भारत एक्स्प्रेस 16 जून ते 20 ऑक्टोबरदरम्यान 6 दिवसांऐवजी सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या दिवशी धावेल. तर, 17 जून ते 19 ऑक्टोबरदरम्यान 22230 सीएसएमटी-मडगाव एक्स्प्रेस ही गाडी मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी धावेल.

22119 मडगाव- सीएसएमटी ट्रेन मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी धावेल तर, 22120 मडगाव सीएसएमटी ट्रेन बुधवार, शुक्रवार आणि रविवारी निर्धारित वेळेत धावेल. 11099 एलटीटी- मडगाव ट्रेन शुक्रवार आणि रविवाकी धावणार असून, 11100 मडगाव एलटीटी ही गाडी शनिवार आणि सोमवारदरम्यान निर्धारित स्थानकांमध्ये धावेल.

पावसाळ्यात का होतात कोकण रेल्वेमार्गावर हे बदल? 

पावसाळी वातावरणामध्ये कोकणाच्या दिशेनं जात असताना डोंगराळ भागांमध्ये रेल्वेमार्गावर दरडी कोसळणं किंवा तत्यम घटनांनी अनेकदा प्रवासामध्ये अडथळे निर्माण होतात. या घटनाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावर आपात्कालीन घटना रोखण्यासाठीच्या काही उपाययोजना राबवल्या असून, त्याच धर्तीवर सावधगिरी म्हणून रेल्वेच्या वेळापत्रकांमध्ये हा बदल करण्यात येतो.

पावसाच्या दिवसांमध्ये रेल्वेगाड्यांच्या वेगमर्यादेवरही रेल्वे प्रशासन लक्ष केंद्रीत करत असून नव्या वेळापत्रकाअंतर्गत हे नवे बदल लागू असतात. ज्यानुसार रोहा ते ठोकूरदरम्यान रेल्वेचा वेग ताशी 120 किमी ऐवजी 75 किमी इतका असतो. सहसा पावसाचं प्रमाण वाढल्यास कोकण रेल्वे मार्गावर गाड्यांचा वेग ताशी 40 किमीवरही आणला जातो ज्यांमुळं प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात खोळंबा होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *