पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर जोरदार पलटवार केला आहे. भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तान पुरता हादरला आहे. त्यामुळे पाकिस्तानने जम्मू-काश्मीर, अमृतसर आणि राजस्थानच्या सीमेला लागून असलेल्या शहरांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. गुरुवारी रात्री पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण भारताच्या S-400 एअर डिफेन्स सिस्टीमने तो हाणून पाडला. याआधीही पाकिस्तानने भारताच्या 15 शहरांमधील लष्करी ठिकाण्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, पण भारताने तो S-400 मुळे अयशस्वी केला. अमेरिकेने या वादात हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे, तर सौदी अरेबिया आणि इराणने भारताला पाठिंबा दर्शवला आहे. भारताने पाकिस्तानला दहशतवाद थांबवण्यास सांगितले आहे.
पाकिस्तानचे ५० ड्रोन पाडले
गुरुवारी रात्री सीमेवर भारतीय लष्कराने एक मोठे ऑपरेशन केले. हे ऑपरेशन पाकिस्तानी ड्रोन मारण्यासाठी होते. सैन्याने 50 पेक्षा जास्त पाकिस्तानी ड्रोन पाडले. पाकिस्तानने अनेक ड्रोन भारतीय हद्दीत पाठवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर हे ऑपरेशन सुरू करण्यात आले. पाकिस्तान वेगवेगळ्या ठिकाणांहून ड्रोन पाठवत होता. भारतीय लष्कराच्या एअर डिफेन्स युनिटने त्वरित कारवाई केली आणि उधमपूर, सांबा, जम्मू, अखनूर, नगरोटा आणि पठाणकोट यांसारख्या भागात ड्रोनला लक्ष्य केले.
आम्ही हस्तक्षेप करणार नाही-अमेरिका
या कारवाईनंतर अमेरिकेने स्पष्ट केले की, ते भारत आणि पाकिस्तानच्या संघर्षात हस्तक्षेप करणार नाहीत. अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेंस म्हणाले, “भारत आणि पाकिस्तानच्या संघर्षात आमचे काही काम नाही. आम्ही फक्त दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्याचा प्रयत्न करू शकतो, त्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगू शकत नाही.”
