आगामी पावसाळ्याच्या अनुषंगाने घोडबंदर रोडच्या गायमुख घाटातील रस्त्याची दरवर्षीप्रमाणे होणारी दुर्दशा टाळण्यासाठी यंदा दीड महिनाआधीच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून डागडुजीचे काम हाती घेण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ठाण्यावरून घोडबंदरच्या दिशेने घाटातील रस्ता दुरुस्तीचे (डांबरीकरण) काम गुरुवारी सायंकाळी पूर्ण झाले. त्यामुळे घोडबंदरवर सुरू असलेली अवजड वाहनांची कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.
घाटातील उर्वरित कामाचे नियोजन येत्या आठवड्यात केले जाणार असून या काळात वाहतुकीला अडथळा होणार नाही, याबाबत उपाययोजना करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. घोडबंदर रस्त्यावरील गायमुख घाटातील रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम रखडले आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर या घाट रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केले जाते.
मात्र पावसाळा सुरू होताच काही दिवसांत घाटातील रस्त्याची अवस्था खड्यांमुळे बिकट होते. ही कोंडी टाळण्यासाठी यंदा शुक्रवार, २५ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून येथील डागडुजीच्या कामाला सुरुवात झाली. २९ एप्रिल रात्री १२ वाजेपर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र डांबरावर प्रक्रिया करणाऱ्या प्लांटमध्ये बिघाड झाल्याने या मार्गावरील अवजड वाहनांचा विशेष दोन दिवसांसाठी म्हणजेच गुरुवार रात्री ११.५५ वाजेपर्यंत वाढवण्यात आला होता. तो ब्लॉक पूर्ण होण्याआधीच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या टीमने घाटातील रस्ता दुरुस्ती मोहीम फत्ते केली. त्यामुळे कित्येक तास कोंडीत अडकणाऱ्या वाहनचालकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
अभियंते, कामगारांची टीम
मुंबई आयआयटीचे सहा अभियंते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे १५ अधिकारी कर्मचारी आणि २० ते २५ कामगारांच्या मदतीने पाच ते सहा दिवसांत ही मोहीम पार पडली. दिवसरात्र हे काम सुरु होते. या काळात सहाशे मीटर मार्गिकेचे काम पूर्ण करण्यात आले असून येत्या आठवड्यात ‘मायक्रो सरफेसिंग चे कामही वाहतुकीला अडथळा न होता पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
