दशभराच्या काळापासून मुंबई शहरात पुनर्विकासाच्या कामांना प्रचंड वेग आला असून, अनेक चाळी आणि जुन्या संकुलांची जागा आता गगनचुंबी इमारती आणि मोठाल्या आलिशान All Amanities अर्थात सर्व सुविधा असणाऱ्या संकुलांनी घेतली आहे. अगदी शहरात अनेक वर्षांपासून असणाऱ्या बीडीडी चाळींचासुद्धा यात समावेश असून येत्या वर्षभरात येथील रहिवाशांना नव्या, हक्काच्या आणि मोठ्या घरात जाण्याची संधी मिळणार आहे.
मुंबई शहरात अतिशय मोक्याच्या ठिकाणी असणाऱ्या या बीडीडी चाळींची पुनर्विकास प्रक्रिया सुरू झाली असून, या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आता रहिवाशांनी आपली फसवणूक होत असल्याचा गंभीर आरोप केल्यामुळं आता या प्रकल्पाकडे सर्वांच्या नजरा वळल्या आहेत.
काय आहे प्रकरण?
मुंबईतील वरळीतील बीडीडी चाळीतील रहिवाशी आक्रमक झाले असून, रहिवाशांना सुरुवातीला पुनर्विकासाअंतर्गत 500 चौरस फूट इतकं मोठं घर देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. प्रत्यक्षात मात्र घरांची बांधणी करतना 485 स्क्वेअर फुटाची घरं बांधण्यात आली. ही वस्तूस्थिती पाहता वरळीतील बीडीडी चाळ इथं वास्तव्यास असणाऱ्या आणि पुनर्विकसाअंतर्गत नव्या घराच्या प्रतीक्षेत असणारे रहिवाशी प्रचंड आक्रमक झाले आहेत.
प्रतिष्ठीत वृत्तपत्राच्या माहितीनुसार, आपली फसवणूक झाल्याचं येथील रहिवाशांचं म्हणणं असून, प्रत्येकाला नुकसानभरपाई स्वरुपात 7,50,000 रुपये देण्याची मागणी उलचून धरण्यात आली आहे. तेव्हा आता रहिवाशांच्या या मागणीवर आणि त्यांच्या संतापावर नेमका कसा तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल.
दरम्यान सध्या वरळीतील बीडीडी चाळ येथे पोलीस मैदान परिसरात बीडीडी चाळींच्या जागेवरच आठ विंगचं बांधकाम पूर्ण झालं असून, तिथं जवळपास दोन हजार कुटुंबांचं पुनर्वसन करण्यात येणार आहे. तर, साने गुरुजी मैदान इथं बांधण्यात येणाऱ्या चार विंगच्या कामालाही आता वेग आला आहे.
बीडीडीतील घरांच्या लॉटरीत गडबड?
बीडीडी चाळीच्या नवीन घरांसाठी स्थानिक रहिवाशांची लॉटरी काढण्याच्या प्रक्रियेदरम्यान म्हाडानं काही इमारतींना झुकतं माप दिल्याच्या आरोपावर मुंबई उच्च न्यायालयानं लक्ष देत चार वर्षांपूर्वी ना. म. जोशी मार्गावरील 7,8,9,10 या चार चाळींच्या लॉटरीला स्थगिती दिली. जिथं काही इमारतींना जाणीवपूर्वक वरच्या मजल्यांर घरं देण्यात आल्याचा आरोप करत ही बाब म्हाडाच्या धोरणाविरोधात असल्याचं न्यायालयापुढं निदर्शनास आणण्यात आलं.
