कुर्ला, पवई, बोरिवली हिरवीगार होणार, ४ एकर भूखंडावर वृक्षारोपणाचा प्रस्ताव प्रशासनाकडे सादर

मुंबईच्या हरित क्षेत्रात वाढ व्हावी, तसेच पर्यावरण संतुलनासाठी महानगरपालिका प्रशासनाने कुर्ला, पवई, बोरिवली येथील तब्बल ४ एकर भूखंडावर वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला आहे. या भूखंडावर सुमारे ३.५ हजार झाडांचे पारंपरिक पद्धतीने रोपण करण्यात येणार आहे. या उपक्रमाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून संबंधित प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी महानगरपालिका आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. प्रशासकीय मंजुरीनंतर वृक्षारोपणाला सुरुवात करण्यात येणार आहे.

मुंबईत सुरू असलेल्या विविध विकासकामांचा फटका पर्यावरणाला बसत आहे. विकासकामांआड येणाऱ्या अनेक झाडांवर कुऱ्हाड चालविली जात आहे. दरम्यान, पर्यावरणाशी समतोल साधत विकासकामांवर भर देण्याचा प्रयत्न महापालिका करत आहे. महापालिकेच्या उद्यान खात्यामार्फत वेळोवेळी वृक्षारोपण केले जाते. वृक्षसंपदेत वाढ व्हावी यादृष्टीने गतवर्षी जुलै महिन्यात मुंबईतील तीन मोठ्या भूखंडांवर वृक्षलागवड करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. यासाठी कुर्ल्यातील चांदिवली, पवई आणि बोरिवली या तीन ठिकाणी वृक्षलागवडीसाठी आरक्षित असलेल्या भूखंडांची निवड करण्यात आली होती. त्यानुसार आता लवकरच महापालिकेच्या उद्यान खात्यातर्फे राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाअंतर्गत तब्बल ४ एकर भूखंडावर पारंपरिक पद्धतीने ३.५ हजार झाडांचे रोपण करण्यात येणार आहे. याबाबत राबविण्यात आलेली निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. संबंधित प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी महानगरपालिका आयुक्त तसेच प्रशासक भूषण गगराणी यांच्याकडे पाठविण्यात आला असून मंजुरी मिळाल्यांनतर प्रत्यक्ष वृक्षलागवडीला सुरुवात करण्यात येणार आहे.

झाडांच्या देखभालीची जबाबदारी कंत्राटदारावर

वृक्षलागवडीचे काम तीन महिन्यात पूर्ण करण्याचा महापालिकेचा मानस आहे. वृक्षलागवड आणि झाडांच्या सुरुवातीच्या देखभालीची सर्व जबाबदारी कंत्राटदारावर सोपविण्यात आली असून दोन वर्षांनंतर या झाडांची देखभाल महापालिकेच्या उद्यान खात्यामार्फत केली जाणार आहे. विकासकाने पवई, कुर्ला आणि बोरिवलीतील जागेवर चटईक्षेत्र निर्देशांकानुसार बांधकाम करून टीडीआर स्वरूपात तीन भूखंड महापालिकेला वृक्षारोपणासाठी हस्तांतरित केले. त्यानंतर महापालिकेने या ४ एकर भूखंडावर वृक्षारोपणाचा निर्णय घेतला. महापालिका आयुक्तांच्या मंजुरीनंतर या भूखंडांवर हरित क्षेत्र विकसित होणार आहे. परिणामी, पर्यावरणाचाही समतोल राखला जाईल.

मियावाकीला पद्धतीलाही प्राधान्य

पारंपरिक पद्धतीने वृक्षारोपण केल्यामुळे फार खर्च लागत नाही. सुरुवातीचे काही महिने योग्य काळजी आणि देखभाल केल्यांनतर झाडे स्वतःहून वाढायला लागतात. पारंपरिक वृक्षारोपणासह महापालिकेने मियावाकी पद्धतीने वृक्षारोपण करण्याचाही निर्णय घेतला आहे. याबाबतही निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून एका कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे. पालिकेच्या या पर्यावरणपूरक उपक्रमांमुळे काही प्रमाणात हरित क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *