मीठाशिवाय अन्नाला चव नाही हे खरे असले तरी जेवणातील मिठाचा अतिवापर हा सुद्धा आरोग्यासाठी हानिकारक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, भारतीय व्यक्ती अपेक्षित ५ ग्रामपेक्षा जास्त मिठाचे सेवन करतात. तर मुंबईकर प्रतिदिन ९ ग्रॅम मीठाचे सेवन करतात. त्यामुळे रोजच्या आहारात मीठ व साखरेचे प्रमाण कमी करण्याबाबत नागरिकांना माहिती देण्यासाठी मुंबई महापालिकेने मीठ व साखर जनजागृती’ अभियानाचा संकल्प सोडला आहे.
जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने महानगरपालिका मुख्यालयात पार पडलेल्या एका कार्यक्रमात मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या उपस्थितीत ‘मीठ व साखर जनजागृती’ या अभियानाला प्रारंभ झाला. याप्रसंगी ‘मीठ व साखर जनजागृती’ अभियानाच्या भित्तीफलकाचे प्रकाशन करण्यात आले. मुंबईकरांच्या आहारामध्ये प्रतिदिन वापरल्या जाणाऱ्या मिठाचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी अभियानाची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याचे निर्देश भूषण गगराणी यांनी या कार्यक्रमादरम्यान सार्वजनिक आरोग्य विभागाला दिले.
