वक्फ सुधारणा विधेयक मंजूर करून भाजप सरकारचा जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न असला तरी याच्याआडून पद्मनाभ मंदिरातील प्रचंड मोठ्या प्रमाणात असलेल्या सोन्यावर त्यांना डल्ला मारायचा आहे. त्यासाठीच हा सर्व खेळ सुरु आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
रविवारी येथे सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस कार्यकर्ता मेळावा झाला. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना सपकाळ यांनी भाजपवर टीका केली. देशात महागाई प्रचंड वाढली आहे. मराठी शाळा बंद होत आहेत. रोजगार नाही. अशी परिस्थिती असताना केंद्र सरकारने वक्फ मंडळ हे एक खेळणे हाती दिले असून आपण हातावर हात ठेवून पहात बसलो आहोत. इंग्रजांनी दिल्लीत राजधानी वसवण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी भूसंपादन करताना प्रार्थनास्थळे सुरक्षित ठेवण्याची मागणी झाली, त्यासाठी १९१३ मध्ये पुनर्वसनासाठी बनवलेल्या कायद्यातून वक्फ मंडळ बनले. सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे सुरक्षित राहण्यासाठी ते बनवले होते, त्यात मंदिर, मशिद, गुरुद्वारा यांना विशेष अधिकार दिले होते, याकडे सपकाळ यांनी लक्ष वेधले.
यावेळी खासदार डॉ. शोभा बच्छाव, शहराध्यक्ष आकाश छाजेड, माजी आमदार शिरीष कोतवाल, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. गणेश पाटील, शरद आहेर, राजाराम पानगव्हाणे आदी उपस्थित होते.
