नऊ वर्षीय मुलाचे अपहरण करुन हत्या; सांताक्रूझमध्ये दुकानाच्या छतावर आढळला मृतदेह, घटनेनं खळबळ

नऊ वर्षांच्या मुलाचे अपहरण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना सांताक्रूझ परिसरातून समोर आली आहे. ७ नोव्हेंबरला छठपूजेपासून हा मुलगा गायब होता आणि काही दिवसांनी घराजवळच एका दुकानाच्या छतावर त्याचा मृतदेह सापडला होता. या मुलाची याच परिसरात राहणाऱ्या महेश्वर मुखिया याने हत्या केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी त्याला बिहार येथून अटक केली आहे.

सांताक्रूझ परिसरात हा मुलगा कुटुंबीयांसोबत वास्तव्यास होता. ७ नोव्हेंबरला छठपूजा असल्याने त्याचे आईवडील सांताक्रूझ येथील चौपाटीवर गेले होते. रात्री दोघे घरी परतले त्यावेळी मुलगा घरी न आल्याने त्याचा शोध घेतला. मुलगा बेपता झाल्याची त्याच्या कुटुंबीयांनी सांताक्रूझ पोलिस ठाण्यात तक्रार केली. ११ नोव्हेंबरला पोलिसांच्या नियंत्रण कक्षात एक फोन आला. सांताक्रूझ पश्चिमच्या एका दुकानाजवळ दुर्गंधी येत असल्याची माहिती देण्यात आली. सांताक्रूझ पोलिसांना दुकानाच्या छतावर मुलाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह दिसला. मुलाच्या अंगावर असलेल्या कपड्यावरून पोलिसांनी त्याची ओळख पटवली. याप्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला.

पोलिस उपायुक्त दीक्षित गेडाम, वरिष्ठ निरीक्षक वैभव शिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक ज्योती हिबारे, रणजीत आंधळे, सहाय्यक निरीक्षक तुषार सावंत, सुयोग अमृतकर, उप निरीक्षक धनंजय आव्हाड, शशिकांत हिंगवले, हिरेमठ, गावडे आदींच्या पथकाने तपास सुरू केला. तपासा दरम्यान पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही फूटेजची तपासणी केली. एका फूटेजमध्ये मुलगा महेश्वर जाताना दिसला. महेश्वर बिहार येथे गेल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या पथकाने बिहारच्या मधुबनी गावात सापळा रचून महेश्वर याला पकडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *