परीक्षांचे रखडलेले निकाल व जाहीर झालेल्या निकालामधील असंख्य त्रुटींमुळे नेहमी चर्चेत असलेल्या मुंबई विद्यापीठाने पुनर्परीक्षांचे (एटीकेटी) निकाल निर्धारित वेळेत जाहीर केले आहेत. कोणत्याही परीक्षेचा निकाल ४५ दिवसांत जाहीर करणे अपेक्षित असताना पुनर्परीक्षांअंतर्गचा तृतीय वर्ष बी.एस्सी. सत्र ६ या अभ्यासक्रमाचा निकाल अवघ्या ९ दिवसांत, तर बी.कॉम. सत्र ६ या अभ्यासक्रमाचा निकाल १६ दिवसांत जाहीर करण्यात आला. तसेच बी.कॉम. अकाऊंट अँड फायनान्स सत्र ६ या परीक्षेचा निकाल २२ दिवसांत आणि बीएमएस सत्र ६ परीक्षेचा निकाल २० दिवसांत जाहीर करण्यात आला आहे.
दरम्यान, हिवाळी द्वीतीय सत्र २०२४ अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या बी.कॉम. सत्र ६ एटीकेटी परीक्षा १४ हजार १९१, तर बी.एस्सी. सत्र ६ या अभ्यासक्रमाची परीक्षा २ हजार ९२६ विद्यार्थ्यांनी दिली. बी.कॉम. अकाऊंट अँड फायनान्सस अभ्यासक्रमाची परीक्षा १ हजार ३१, तर बीएमएस अभ्यासक्रमाची परीक्षा ही १ हजार ५४९ विद्यार्थ्यांनी दिली. तसेच पदवीस्तरावरील औषधनिर्माणशास्त्र (बी. फार्म.) सत्र ८ अभ्यासक्रमाचा निकाल १८ दिवसांत आणि वास्तुकला (बी. आर्च.) सत्र ६ चा निकाल १४ दिवसांत जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना सदर निकाल विद्यापीठाच्या http://www.mumresults.in/ या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येईल. ‘शिक्षक आणि प्रशासकीय यंत्रणांनी मूल्यांकनाचे काम जलदगतीने करून निर्धारित वेळेत निकाल जाहीर केले. उर्वरित परीक्षांचे निकाल जाहीर करण्याचे काम प्रगतीपथावर आहे‘, असे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी स्पष्ट केले.