विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या प्रचार मिरवणूका सुरु आहेत. ठाणे शहरातील प्रत्येक उमेदवारांचे प्रचार करण्याचे स्वरुप हे वेगळे असल्याचे पाहायला मिळत आहे. मिरवणूकीत गर्दी दिसण्यासाठी काही उमेदवारांकडून दिवसाच्या मोबदल्यावर रिक्षा चालकांना बोलावून मिरवणूकीत सहभागी केले जात आहे. तर, काही उमेदवारांकडून रिक्षामध्ये ध्वनीक्षेपक तसेच उमेदवाराच्या छायाचित्राचे फलक लावून ती रिक्षा मतदारसंघात फिरवली जात आहे. या प्रचार आणि मिरवणूकांमुळे रिक्षा चालकांना अच्छे दिन आल्याचे दिसत आहे.
सर्वत्र विधानसभा निवडणूकीचे वारे वाहत असून उमेदवारांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. मतदार संघात सकाळी मिरवणूक तर, संध्याकाळी सभा असे सध्या उमेदवारांचे वेळापत्रक ठरलेले आहेत. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची तारेवरची कसरत सुरु असल्याचे दिसून येते. परंतू, इतक्या कमी वेळात प्रत्येकापर्यंत पोहोचणे शक्य होत नाही यासाठी उमेदवारांकडून वेगवेगळी शक्कल लढवली जात आहे. ठाणे शहरात ओवळा – माजिवडा, कोपरी -पाचपाखाडी, ठाणे शहर आणि कळवा- मुंब्रा असे विधानसभा मतदार संघ आहेत. शहरात या मतदार संघातील उमेदवारांच्या प्रचार मिरवणूका, मेळावे आणि सभा आयोजित केल्या जात आहेत. या मिरवणूकांमध्ये गर्दी दिसावी तसेच मिरवणूकीत कार्यकर्त्यांना पायी चालण्यास त्रास होऊ नये यासाठी रिक्षा चालकांना सहभागी केले जात आहे. या रिक्षांना पक्षाचा झेंडा लावून या रिक्षा मिरवणूकीत फिरवल्या जातात. यासाठी रिक्षा चालकांना दररोजचा मोबदला दिला जात आहे.