लोकांच्या मनात नव्हे, तर पुढाऱ्यांच्या मनात जात असते. निवडणूक आली, की आपल्या जातीची एवढी मते आहेत, असे सांगत इच्छुक आपापल्या पक्षाकडे उमेदवारी मागतात, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अंबड येथे महायुतीच्या प्रचारसभेत सांगितले.
गडकरी म्हणाले, आपण लोकसभेला होतो. आमच्याकडे जातीवादाची भुते होती. जो करेगा जात की बात उस को मारूंगा लाथ, असे आपण पंचवीस हजार लोकांसमोर बोलताना सांगितले. मला सर्व जाती-धर्मांच्या लोकांनी मतदान केले. माणसाच्या मोठेपणाचा संबंध त्याच्या जात, धर्म, भाषेशी नसतो, तर त्याच्या विचारांशी असतो. संत एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकडोजी, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, राजर्षी शाहू महाराज यांच्या मोठेपणाचा संबंध त्यांच्या जात-धर्माशी नसून, विचारांशी आहे. या संदर्भात जनतेच्या प्रबोधनाची गरज आहे, असे ते म्हणाले.