एकूण लोकसंख्येत ज्या समाजघटकाचे जेवढे प्रमाण त्यानुसार वाटा ठरला पाहिजे. अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी, अल्पसंख्याक यांचे प्रमाण ९० टक्के असेल तर आरक्षण तेवढे का नको? असा प्रश्न उपस्थित करून संसदेतील विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी आमचे सरकार आल्यास ५० टक्क्यांची ही मर्यादा आम्ही काढून टाकू, असे आश्वासन देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले.
शहरातील नवा मोंढा मैदानावर गुरुवारी नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व नऊ विधानसभा मतदारसंघांतील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. जिल्ह्यातील कौठा भागात झालेल्या सभेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी दाखवतात ते लाल पुस्तक आतून कोरे असल्याची टीका केली होती. त्याचा संदर्भ घेऊन उत्तर देताना खासदार गांधी म्हणाले, मोदींनी संविधान वाचलेच नाही. जाहीर कार्यक्रमात ते संविधानाचा आदर करत असल्याचे दाखवतात. परंतु गुप्त बैठकीत संविधान कसे संपवता येईल, याचे षडयंत्र करत असतात, असा आरोप केला. आमच्याकडे विचारधारेची लढाई, संविधान, प्रेम, आदर, बंधुभाव आहे तर भाजपा व संघाकडे द्वेष, हिंसा, तिरस्कार व संविधानाचा सफाया हे उद्दिष्ट आहे. या लढाईत आता सर्वसामान्यांनी उडी घ्यावी. केवळ ९० अधिकारी देशाचे एकूण बजेट वितरीत करीत असतात. अदानीच्या कंपनीत महत्त्वाच्या पदांवर एकही दलित, आदिवासी आढळणार नाही. हे चित्र बदलण्याची गरज असल्याचे राहुल गांधी म्हणाले. २४ जणांना १६ लाख कोटी माफ, धर्माधर्मांत आणि जातीजातीत भांडणे लावायचे उद्याोग भाजप व रा.स्व. संघ करीत असतो. मुंबई तील धारावी एक लाख कोटी रुपयांत अदानीला आंदण दिली आहे. तुम्ही गप्प कसे काय बसू शकता, असा प्रश्न उपस्थित करीत निवडणुकीत महायुतीचा पराभव करण्याचे आवाहन राहुल गांधींनी केले.
नंदुरबार : नरेंद्र मोदी यांनी जीवनात एकदाही संविधान वाचलेले नसल्याने त्यात काय आहे, हे त्यांना माहित नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी संविधान रिकामेच आहे. संविधानाच्या प्रतीवर कोणता रंग आहे, त्याविषयी आम्हाला काहीही घेणेदेणे नाही. संविधानात जे लिहिले आहे. त्याचे आम्ही रक्षण करत असून त्यासाठी प्राण देण्यासही तयार आहोत, असे प्रत्युत्तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. नंदुरबार येथे जिल्ह्यातील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ गुरुवारी राहुल गांधी यांची जाहीर सभा झाली. या सभेत गांधी यांनी संविधान आणि आदिवासींच्या हक्कांचे रक्षण, यावर पूर्णपणे भर दिला. भाषणादरम्यान व्यासपीठावरील बिरसा मुंडा यांची प्रतिमा उचलून गांधी नतमस्तक झाले.
महाराष्ट्रातील सरकार अदानींनी पाडले
महाराष्ट्रातील मविआचे सरकार पाडण्यासाठी जी बैठक झाली होती, त्यात अदानी कशासाठी होते, असा प्रश्न उपस्थित करून राहुल गांधी माध्यमांवरही घसरले. माध्यमांत मोदींचे मित्र आहेत. त्यात त्यांचा दोष नाही. कारण ते वेतनावर काम करतात. ७० हजार कोटी रुपयांत यूपीए सरकारने देशातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती. इथे एकट्या मुंबईत अदानींना एक लाख कोटी रुपयांची धारावी आंदण दिली असल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला.