सोलापुरातील महाविकास आघाडीतील वाद विकापोला गेला आहे. आघाडीच्या उमेदवाराविरुद्धच काँग्रेसने उभे केलेले बंडखोर, यावर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला दिलेला इशारा, दुसरीकडे डाव्या आघाडीचे उमेदवार माजी आमदार नरसय्या आडम यांच्या घरावर झालेली दगडफेक यातून आघाडीतील मतभेद हिंसेवर आलेले असताना बुधवारी ठाकरे गटाने जिल्ह्यातील काँग्रेसच्या सर्व अधिकृत उमेदवारांच्या प्रचारावर बहिष्कार जाहीर केला आहे. पक्षाचे सहसंपर्कप्रमुख, माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांनी ही घोषणा केली आहे.
सोलापूर महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये जागावाटपापासूनच मतभेदांना सुरुवात झालेली होती. जागावाटप झाल्यानंतर या मतभेदांनी वादाचे रूप धारण केले. बहुतांश मतदारसंघांत अधिकृत उमेदवाराविरुद्ध आघाडीतीलच अन्य पक्षाच्या उमेदवारांनी बंडखोरी केलेली आहे. या बंडखोरीनंतर हे पक्ष आघाडीचा प्रचार करण्याऐवजी आपल्या पक्षाच्या बंडखोराच्या प्रचारातच गुंतलेले आहेत. हा सर्व प्रकार वाढत गेल्यावर दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेसला आघाडी धर्माची आठवण करून देत तातडीने सुधारणा करण्याचा इशारा दिला. तसेच काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांची जाहीर सभेत कानउघाडणीदेखील केली. परंतु हे सर्व झाल्यावरही सोलापुरात कॉंग्रेस पक्ष त्यांच्याच बंडखोराच्या प्रचारात सहभागी होत आघाडीपासून दूर राहिल्याने शिवसेनेतून (उद्धव ठाकरे) संताप व्यक्त होऊ लागला होता. याचीच परिणती आज ठाकरे गटाने जिल्ह्यातील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारावर बहिष्कार जाहीर केला आहे.