मुंबई : श्रावणात तीर्थस्थळी मोफत एसटी सेवा

राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या विविध आगारातून श्रावण महिन्यानिमित्त तीर्थक्षेत्री जाण्यासाठी ‘श्रावणात एसटी संगे तीर्थाटन’ हा अभिनव उपक्रम सोमवारपासून सुरू करण्यात येत आहे. त्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक, महिला यांना मोफत आणि माफक दरात तीर्थाटनाचा आनंद घेता येणार आहे. या उपक्रमात जास्तीत जास्त एसटी प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे.

श्रावण मासात अनेक ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. त्या अनुषंगाने बहुतांश नागरिक कुटुंबासह तीर्थक्षेत्री जाण्याचे नियोजन करतात. त्यासाठी एसटीने ‘श्रावणात एसटी संगे तीर्थाटन’ हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. एसटीच्या प्रत्येक आगारातून श्रावण महिन्यात एकदिवसीय अथवा एक मुक्कामी धार्मिक सहलीचे आयोजन करण्यात येते. त्यात सर्व प्रकारच्या सवलती दिल्या जातील. अमृतमहोत्सवी ज्येष्ठांना मोफत, ज्येष्ठ नागरिक व महिलांना आणि १२ वर्षाच्या आतील मुलांना अर्धे तिकीट आकारण्यात येईल. गावातील महिला बचत गट, ज्येष्ठ नागरिक संघ, विविध सेवाभावी संस्था यांच्या पुढाकाराने अशाप्रकारे सांघिक सहलीचे आयोजन केले जाते.

त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, मार्लेश्वर अशा तीर्थक्षेत्रांबरोबरच अष्टविनायक, दर गुरुवारी नृसिंहवाडी, औदुंबर दर्शन, शनिवारी मारुती दर्शन अशा धार्मिक सहलीचे आयोजन केले जाते. सवलतीमुळे माफक दरात तीर्थाटन करण्याचा आनंद सामान्यांना मिळतानाच एसटीच्या प्रवासी संख्येत वाढ होण्यास मदत होणार आहे. राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, महिलांना प्रवासात ५० टक्के सवलत असे निर्णय राज्य शासनाने घेतले आहेत. एसटीकडे प्रवाशांचा ओघ वाढतानाच कर्मचाऱ्यांनी चांगली सेवा आणि अभिनव उपक्रमांमुळे एसटीच्या उत्पन्नात भर पडेल, अशी कामगिरी करण्याचे आवाहन एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *