“पूजा खेडकर एक फायटर, प्रत्येक स्तरावर त्यांना…”, न्यायालयात वकिलाचा आक्रमक युक्तिवाद, अटकेवर उद्या निकाल!

गेल्या महिन्याभरात IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरणावरून मोठा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. पूजा खेडकर यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यासंदर्भात पूजा खेडकर यांनी दिल्लीतील पतियाला हाऊस कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला असून त्यावर सुनावणी चालू आहे. या सुनावणीदरम्यान, पूजा खेडकर यांनी दाखल केलेल्या अर्जावर दिल्ली पोलीस व यूपीएससी यांच्याकडूनही युक्तिवाद सादर करण्यात आला. त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर गुरुवारी निकाल येण्याची शक्यता आहे. यावेळी पूजा खेडकर यांच्यावतीने वकील बिना माधवन यांनी आक्रमक युक्तिवाद केला.

नेमकं प्रकरण काय?

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात गैरवर्तन केल्याचा ठपका पूजा खेडकर यांच्यावर आधी ठेवण्यात आला. त्यानंतर हे प्रकरण चर्चेत आलं. पुढे पूजा खेडकर यांनी सनदी सेवेत निवड होताना त्यांच्या दिव्यंगत्वाबाबत चुकीची कागदपत्रे सादर केल्याचाही आरोप करण्यात आला. शिवाय, त्यांच्या वडिलांची कोट्यवधींची मालमत्ता असूनही त्यांनी ओबीसी क्रिमी लेअर सुविधेचा लाभ घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, यासाठी त्यांनी परीक्षेसाठी अर्ज करताना नावामध्येही वारंवार बदल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी याचबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून त्याचा उल्लेख न्यायालयातील सुनावणीमध्ये करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *