धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा शहरात दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले आहे. पोहण्यासाठी गेलेल्या १८ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. शहरातील चैनी रोड परिसरात रेल्वे पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे साईड रोड असलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. यापूर्वी १७ जुलै रोजी लेंडूर नाल्याला आलेल्या पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात आल्यामुळे पाणी साचले आहे.
सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास तीन मित्र साचलेल्या पाण्याच्या येथे पोहोण्यासाठी गेले असता, पाण्याचा अंदाज घेऊन दोनजण बाहेर निघाले तर अल्ताफ शहा सलीम शहा (वय १८) तरुणाला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो बुडाला. या घटना वाऱ्यासारखी पसरताच अल्ताफचे शोध कार्य सुरू झाले. पोकलेनच्या साह्याने माती बाजूला काढण्यात आली. यामुळे बुडालेला अल्ताफ हाती लागला आणि उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय डॉक्टर अधिकारी यांनी अल्ताफला तपासून मृत्यू घोषित केले.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अल्ताफ हा एकुलता एक होता शरद पवार नगर डाल्टा घरकुल या ठिकाणी तो राहत होता. अल्ताफची परिस्थिती हालाखीची होती, त्याच्या पश्चात आई वडील आहे.
भररस्त्यात बिबट्याचा मुक्त संचार
धुळे शहरालगत असलेल्या नकाने तलाव परिसरामध्ये गेल्या दोन दिवसापासून बिबट्या असल्याची माहिती समोर आली होती. त्या अनुषंगाने वन विभागाच्यावतीने बिबट्याची पाहणी करण्यात आली. मात्र बिबट्या आढळला नाही. पण २३ जुलै रोजी रात्री पावणे नऊच्या दरम्यान नकाने तलाव परिसराजवळ असलेल्या मातोश्री वृद्धाश्रम आणि प्रियदर्शनी जिमखान्याजवळ बिबट्याचा वावर दिसला. प्रियदर्शनी जिमखानाचे कर्मचारी रात्री घरी येत असताना त्यांना बिबट्याचं दर्शन झालं. मुक्तपणे बिबट्या या ठिकाणी वावरत होता. त्यामुळे आता वनविभागाच्या वतीने या भागांमध्ये नागरिकांनी फिरू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. वन विभागाच्या वतीने आता या बिबट्याला पकडण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्या अशी मागणी होत असून संपूर्ण धुळे शहरांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
