बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या ७ तलावांपैकी विहार आणि मोडक सागर हे दोन्ही तलाव आज भरुन ओसंडून वाहू लागले आहेत. यापैकी विहार तलाव हा आज मध्यरात्री ३ वाजून ५० मिनिटांनी; तर मोडक सागर तलाव आज सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी ओसंडून वाहू लागला आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जलअभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे. यापूर्वी गेल्याच आठवड्यात २० जुलै २०२४ रोजी तुळशी तलाव, तर काल २४ जुलै २०२४ रोजी तानसा तलाव देखील ओसंडून वाहू लागला होता. त्या पाठोपाठ आज एकाच दिवशी आणखी दोन तलाव पूर्ण भरून व ओसंडून वाहू लागले आहेत.
यंदाच्या पावसाळ्यात बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी ४ तलाव आता पूर्ण क्षमतेने भरुन ओसंडून वाहिले आहेत. मागील काही दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे.
