कर्जबाजारीपणाला कंटाळून एका व्यावसायिकाने आत्महत्या केली. भावेश सेठ असं या व्यावसायिकाचं नाव आहे. त्यांचा बॉल बेअरिंगचा व्यवसाय आहे. मृत्यूपूर्वी त्यांनी मुलाला फोन केला आणि सॉरी म्हटलं. त्यानंतर वांद्रे-वरळी सी लिंकवरुन उडी मारुन आयुष्य संपवलं. या घटनेमुळे मुंबईत हळहळ व्यक्त होते आहे. मागच्याच आठवड्या वडील आणि मुलाने भाईंदरमध्ये कर्जाचा बोजा वाढल्याने हातात हात घालून ट्रेनखाली येऊन जीव दिला. आता आत्महत्येची आणखी एक घटना समोर आली आहे. मुलाला फोन करुन त्यांनी सी लिंकवरुन उडी मारली आणि आयुष्य संपवलं.
भावेश सेठ यांनी नैराश्यातून उचललं पाऊल
व्यवसायात कर्जबाजारी झालेल्या भावेश सेठ यांनी नैराश्यातून हे पाऊल उचललं. बुधवारी दुपारी १ च्या सुमारास अज्ञात व्यक्तीकडे भावेश यांनी सी लिंक पर्यंत लिफ्ट मागितली. सी लिंकवर उतरल्यानंतर त्यांनी मुलगा स्मिथ शेठला फोन केला. त्याला सॉरी बेटा असं म्हणाले आणि आत्महत्या करत असल्याची कल्पना दिली. त्यानंतर सी लिंकवरुन स्वतःला समुद्रात झोकून दिलं आणि आत्महत्या केली. सी लिंकवरच्या पोलीस कर्मचाऱ्यांना या घटनेची माहिती मिळातच पोलीस मच्छिमारांसह भावेश सेठ यांच्या मदतीला धावले. त्यांना बाहेर काढण्यात आलं तसंच उपचारांसाठी भाभा रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र उपचारांच्या दरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. पोलिसांना आत्महत्या केलेल्या जागेवर सुसाईड नोटही सापडली त्यामध्ये त्यांनी सॉरी बेटा, सर्व गोष्टींसाठी, कुटुंबाची काळजी घे असं म्हटलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी अपमृत्यूची नोंद केली आहे.
