कोकणात पावसाचा कहर पहायला मिळत आहे. दापोली तालुक्यात साखलोळी इथे डोंगर खचल्याची घटना घडली आहे. सध्या दरड किंवा रस्ता खचण्याच्या घटना घडत आहे. जोरदार पावसामुळे खेडच्य़ा शिवतर गावातील नामदरेवाडीकडे जाणारा रस्ता एका ठिकाणी खचून तो पूर्ण वाहून गेला आहे. त्यामुळे या वाडीतील ग्रामस्थांची गैरसोय झाली आहे.
गुहागर तालुक्यातील पाचेरी सडा गावालगतचा डोंगर खचला
रत्नागिरीतील गुहागर तालुक्यातील पाचेरी सडा गावालगतचा डोंगर खचू लागला आहे. कोकणात मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. पाचेरी सडा गावाजवळील डोंगर खचू लागल्यानं या डोंगरालगतच्या नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले. दरम्यान या भूस्खलनामुळे गावाला पाणीपुरवठा करणारी टाकीही खचली. त्यामुळे ग्रामस्थांना पाणीटंचाईचाही सामना करावा लागतो. डोंगर खचू लागल्यानं गावक-यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.
