वाई येथील एमआयडीसीमध्ये सोमवारी रात्री मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांपैकी एकाने गोळीबार केला. या घटनेत एक युवक जखमी झाला असून अमन सय्यद असे त्याचे नाव आहे. त्याच्या हाताला गोळी लागली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार पूर्व वैमनस्यातून ही घटना घडली असून पोलिस रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी तळ ठोकून होते.
अमन सय्यद व अक्षय निकम यांच्यात जुना वाद आहे. यातूनच सोमवारी रात्री एमआयडीसी येथे अमन याचा अक्षयसह त्याच्या साथीदाराबरोबर वादावादी झाली. त्यावेळी अचानक अक्षयच्या साथीदाराने बंदुक काढून गोळीबार केला. मात्र सय्यदने बचाव करत गोळी हातावर झेलल्याने त्याला गंभीर दुखापत झाली नाही; मात्र गोळीबार झाल्याने परिसर हादरून गेला.
