मुंबई गोवा महामार्गावर दरडींची टांगती तलवार, रुंदीकरणाच्या कामामुळे दरडींचा धोका वाढला

मुंबई गोवा महामार्गावर दरडीची टांगती तलवार कायम आहे. काही दिवसांपूर्वी महाडच्या नांगलवाडी येथे दरड रस्त्यावर आली होती. सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. त्यानंतर महामार्गावर दरडीचा मुद्दा प्रकर्षाने समोर आला. रस्त्यालगतचे डोंगर धोकादायक बनले असून, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वेळीच याबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे.

मुंबई गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम गेली १३ वर्षांपासून सुरू आहे. या महामार्गाचे रुंदीकरण करताना रस्त्यालगतचे डोंगर उभे आडवे कापण्यात आले आहेत. त्यामुळे या डोंगराची माती अतिवृष्टीत खचून रस्त्यावर येण्याची भीती आहे. या मातीबरोबर त्यात असणारे मोठे दगड, झाडे देखील कोसळू शकतात. त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका होऊ शकतो. सध्या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करण्याची वेळ आली आहे. रस्ता आणि डोंगर यामध्ये कुठलेच अंतर नाही त्यामुळे कोसळणारी दरड थेट रस्त्यावर येवू शकते. या पूर्वी जुना रस्ता असताना देखील अशा प्रकारच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. त्यावेळी वाहतूक बंद ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता. महामार्गाचे रुंदीकरण करताना याबाबत कुठलीही उपाय योजना केल्याचे दिसून येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *