मुंबईत २३९ ‘आपला दवाखाना’ सुरू, आतापर्यंत ५७ लाख रुग्णांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ

मुंबईकरांना मोफत आणि घराजवळ आरोग्य सुविधा उपलब्ध करणाऱ्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यांची’ संख्या २३९ झाली असून, आतापर्यंत या दवाखान्यांमध्ये तब्बल ५७ लाखांहून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. प्रस्तावित २५० दवाखान्यांपैकी २३९ दवाखाने सुरू झाले असून उर्वरित ११ दवाखाने लवकरच सुरू करण्यात येणार आहेत.

मुंबईकरांना घराजवळच अधिकाधिक सुलभरित्या आणि मोफत उपचार देण्यासाठी १७ नोव्हेंबर २०२२ रोजी पहिला ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करण्यात आला. त्यानंतर टप्प्याटप्याने ६ जून २०२४ पर्यंत आपला दवाखान्यांची संख्या २३९ वर पोहोचली. यामध्ये ३३ पॉलिक्लिनिक व डायग्नोस्टिक सेंटर, ८१ पोर्टा केबिन, १०८ उपलब्ध दवाखाने आणि १७ रेडी स्ट्रक्चरमधील दवाखाने आहेत. आपला दवाखान्यांतून आतापर्यंत ५७ लाखांहून अधिक लाभार्थ्यांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला आहे. त्यात आपला दवाखान्यात ५६ लाख ४६ हजार ९९४ रुग्णांनी उपचार घेतलेअसून १ लाख ३६ हजार ७५७ लाभार्थ्यांनी पॉलिक्लिनिक आणि डायग्नोस्टिक सेंटरचा लाभ घेतला. येत्या काही दिवसांत महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये ‘शुन्य औषध चिठ्ठी’ धोरण राबविण्यात येणार असल्याचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *