गिर्यारोहणासाठी उत्तरकाशीला गेलेल्या समूहातील नऊ जणांचा मृत्यू, पुण्यातील एका तरुणासह चार जण बेपत्ता

उत्तराखंडच्या उत्तरकाशीमधील सहस्त्रताल शिखरावर चढाई करण्यासाठी गेलेल्या गिर्यारोहकांच्या मोठ्या समूहातील नऊ जणांचा खराब हवामानामुळे मृत्यू झाला आहे. ४,४०० मीटर उंचीवर असलेल्या सहस्त्रताल शिखर आणि आसपासच्या परिसरात गेल्या काही दिवसांपासून वातावरण खराब आहे. याच दरम्यान, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील काही गिर्यारोहकांचा एक मोठा समूह या शिखरावर चढाई करण्यासाठी गेला होता. त्यांच्याबरोबर एक स्थानिक मार्गदर्शकही होता. दरम्यान, खराब वातावरणामुळे या समुहातील गिर्यारोहकांचा मार्ग भरकटला. दाट धुखं आणि बर्फवर्षावामुळे या गिर्यारोहकांना २ जून रोजी कोखली टॉपच्या बेस कॅम्पजवळ रात्र काढावी लागली.

थंडीमुळे गिर्यारोहकांच्या या समूहातील चार महिलांसह पाच जणांची प्रकृती खालावून मृत्यू झाला. याबाबतची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने जमिनीवरून आणि हवाई मार्गाने बचावकार्याला सुरुवात केली. हवाई दल, एसडीआरएफ आणि खासगी हेलिकॉप्टरच्या मदतीने या गिर्यारोहकांना वाचवण्यासाठी बचाव मोहिम हाती घेण्यात आली. दरम्यान, या बचाव पथकांना काही प्रमाणात यश मिळालं असून त्यांनी या गिर्यारोहकांच्या समूहातील ११ जणांची सुटका केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *